बेलापूर – जेएनपीटी वॉटर टॅक्सी सेवा

| उरण | प्रतिनिधी |

नवी मुंबईतील बेलापूर ते जेएनपीटी बंदर या समुद्री मार्गावर सोमवार (दि.17) पासून जलद प्रवासाकरीता वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात येत आहे. या जलसेवेमुळे प्रवाशांना नवी मुंबई ते उरण हा प्रवास अवघ्या 15 मिनिटात करता येणार आहे. या सेवेमुळे विना अडथळा नवी मुंबईतून उरणला व उरणवरून नवी मुंबईत पोहचता येणार आहे.

या आरामदायी व वातानुकूलित प्रवासासाठी एकेरी फेरीला 300 रुपये ते परतीच्या दुहेरी प्रवासा करीता 500 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे बेलापूर सकाळी 8.30, 10.30, 12.30, 2.30, 4.30, व 6.30 तर जेएनपीटी वरून सकाळी 9.15, 11.15, 1.15, 3.15, 5.15 व 7.15 वाजेपर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. या सेवेसाठी मासिक पासची ही सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये एकूण 60 एकेरी फेरीसाठी दरमहा 6 हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. या पासची संख्या मर्यादित असून केवळ 250 पास उपलब्ध आहेत.

सेवा परवडणारी नाही
समुद्री मार्गाने सुरू होणारी बेलापूर ते जेएनपीटी दरम्यानची जलसेवा ही सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी नसल्याच्या प्रतिक्रिया उरणमधील प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. कारण रस्ता रुंदीकरणामुळे सध्या खाजगी वाहनाने उरण ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या वीस मिनिटात करता येत आहे. त्यासाठी एवढी रक्कम का मोजावी. तसेच बेलापूरवरून व जेएनपीटी जेट्टीपर्यंतचा प्रवास कसा करावा ही समस्या निर्माण होणार आहे.

Exit mobile version