रस्ते दोन महिन्यांत फोडण्याची यंत्रणेवर वेळ; करोडो रुपये खर्च करूनही कामांच्या दर्जाबाबत प्रश्न
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बेलकडे ते सहाण बायपास या मार्गावरील डांबरी रस्त्याच्या जागी सिमेंट काँक्रिटचे रस्ते जून महिन्यात बनविण्यात आले होते. मात्र, दोन महिन्यांतच या रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडले. रस्त्याच्या कामांच्या दर्जाबाबत प्रवाशांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अखेर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) या यंत्रणेवर हे रस्ते पुन्हा फोडून दुरुस्ती करण्याची वेळ आली आहे. सध्या ढवरपासून सहाण बायपासपर्यंतचे रस्ते दुरुस्तीचे काम या ठेकेदाराद्वारे केले जात आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील चेंढरे बायपासपासून कुरुळ, बेलकडे, सहाण बायपासपर्यंतचे डांबरी रस्ते होते. या डांबरी रस्त्याच्या जागी नव्याने काँक्रिट रस्ते बनविण्यासाठी करोडो रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत नेमण्यात आलेल्या ठेकेदाराद्वारे हे काम सुरु करण्यात आले. गेल्या आठ महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरु होते. रुंदीकरण, काँक्रिटीकरण व मजबुतीकरण या धर्तीवर या रस्त्याचे काम करण्यात आले. यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक झाडे तोडण्यात आली. अलिबाग-रोहा मार्गावर अलिबाग बायपास, आरसीएफ कॉलनी, कुरूळ, बेलकडे, ढवर, सहाण बायपास, चौलपर्यंत एमएसआयडीसीमार्फत काँक्रिटचे रस्ते बांधण्यात येत आहेत. यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आला आहे. बेलकडेपासून सहाण बायपासपर्यंतच्या रस्त्याचे काम तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र, काही महिन्यात या रस्त्याच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले होते. त्यामुळे अनेकांनी रस्त्याच्या कामांच्या दर्जाबाबत नाराजी व्यक्त केली. निकृष्ट दर्जाचे काम केल्याची ओरड निर्माण झाली होती. खड्डे पडलेल्या रस्त्याचा अनेक भाग खचला होता.
या मार्गावरील ढवरपासून सहाण बायपासपर्यंत पाच ते सहा ठिकाणी रस्ता खोदून पुन्हा नव्याने बनविण्याचे काम केले जात आहे. करोडो रुपये खर्च करूनही दोन ते तीन महिन्यांत पुन्हा नव्याने रस्त्याचे काम करण्याची वेळ संबंधित विभागावर आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ठिकठिकाणी रस्ता पुन्हा खोदून त्याठिकाणी नव्याने सिमेंट, दगडाची भरणी केली जात आहे. या रस्त्याच्या काही ठिकाणी खालचा थर योग्य पद्धतीने बसला नाही. त्यामुळे रस्ता खचल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठेकेदारामार्फत पुन्हा त्याच खर्चात नव्याने रस्ता तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील कुरुळपासून सहाणबायपास रस्ता कायमच वर्दळीचा आहे. या रस्त्यावर काम करताना अनेक अडथळे निर्माण झाले हेोते. मात्र काही भाग खराब झाल्याने पुन्हा खोदकाम करून नव्याने रस्ता तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दिलीप हिंगे,
कार्यकारी अभियंता, एमएसआयडीसी
