जिल्ह्यातील शाळांमध्ये गुंजला घंटानाद

15 जून म्हटले की विद्यार्थ्यांना उत्सुकता असते ती शाळेच्या पहिल्या दिवसाची. उन्हाळी सुट्टी संपल्यावर आणि वरूणराजाचे आगमन होताच शनिवारपासून पुन्हा एकदा जिल्ह्यातील शाळांमध्ये घंटानाद गुंजला आहे. यामुळे महिना दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शाळेत जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि वेगळाच आनंद पहायाला मिळाला. यावेळी शिक्षक वर्गाकडून वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचे स्वागत करताना दिसून आले. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकवर्ग देखील मोठ्या हौसेने हजर झाल्याचे पहायला मिळाले. तसेच, शालेय परिसरात विद्यार्थ्यांचा किलबिलाटही पहायला मिळाला.


गोंधळपाडा येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका व सहशिक्षक यांनी आरती ओवाळून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले होते.


चला आम्ही शाळेत निघालो, तुम्ही पण या शिका आणि मोठे व्हा! पनवेल महानगरपालिका विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी समाज सेविका सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेची वाजत गाजत दिंडी काढण्यात आली होती. यावेळी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प तसेच चॉकलेट देत औक्षण करुन शिक्षणधिकारी यांच्या हस्ते नवीन पुस्तके दऊन करण्यात आले. यामध्ये शिक्षणाधिकारी, शिक्षक वर्ग, पालक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

रातवड विद्यालयात नवागतांचे स्वागत


। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात शनिवारी (दि.15) शैक्षणिक वर्षे 2024-25 मधील शालेय प्रथम दिनाचे औचित्य साधून नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. तसेच, शाळेच्या प्रथम दिनाचे औचित्य साधून नवागत विद्यार्थ्यांचे औक्षण करुन मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच वैशाली जाधव, सतीश पवार, भालचंद्र खाडे, गजानन पाटील, पालक वृंद व मान्यवर उपस्थित होते.

पुर्व तयारी मेळावा उत्साहात

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील देगाव रा.जि.प. शाळेत शनिवारी (दि.15) शाळा पुर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नवागतांचे स्वागत, मोफत पुस्तके वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमसंपन्न झाले.


प्रथम शाळा पूर्व तयारी अभियान अंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेमध्ये इयत्ता पहिलीत दाखल होणार्‍या मुलांचे औक्षण करून शाळेमध्ये स्वागत करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणार्‍या आविष्कार फाउंडेशन इंडीया मार्फत राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2024 ने सन्मनीत अ‍ॅड. पुंडलिक मालोरे, धोंडीराम सूर्यवंशी, खाडे, सचिन मोरे व उपस्थित इतर पालक वर्गाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका ऊर्मिला मोरे, शंकर शिंदे, प्रतिक्षा आंबुर्ले, समिक्षा दिवेकर, शेजल कदम, रोहिणी गायकवाड, ललिता पवार, बेबी पवार, रुपाली पवार, सखाराम मर्चंडे, प्रविणा शेलार आदिंसह पालकवर्ग व देगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

ज्ञानमंदिरात निघालो आम्ही
। धाटाव । वार्ताहर ।
शनिवारी (दि.15) धाटावच्या केंद्रीय शाळेत सकाळच्या शाळेला सुरुवात झाली. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शाळेत जात असल्याने यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह आणि आनंद पहावयास मिळाला. शिक्षक वर्गाकडून वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचे स्वागत करताना दिसून आले. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना शाळेत सोडण्यासाठी पालकवर्ग देखील मोठ्या हौसेने हजर झाल्याचे पहायला मिळाले.


तसेच, शालेय परिसरात विद्यार्थ्यांचा किलबिलाटही पहायला मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट, खाऊ वाटप करण्यात आले. तर, विद्यार्थ्यांचे औक्षण करून फुलांची उधळण करण्यात आली. शाळेचा हा पहिला दिवस उत्साहात साजरा झाला असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. शाळेबाहेर रांगोळ्या काढण्यात आल्या असून सूचना फलक व फळे सजविण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराभोवती शिक्षकवर्ग, कर्मचारी स्वत: उभे राहिले होते. यावेळी मुख्याध्यापक सुनील पारठे, गायकर, मानसी थळे, निकिता धुपकर, प्रणाली जंगम, मोहिनी पाटील, अशोक भोकटे यांसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

शाळेचा पाहिला दिवस उत्साहाचा
। म्हसळा । वार्ताहर ।
दीड महिन्यापेक्षा जास्त दीर्घाकाळाच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी (दि.15) ज्ञानमंदिरे उघडली. यावेळी मराठी प्राथमिक शाळा म्हसळा येथे येणार्‍या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यामुळे दीर्घ काळानंतर विद्यार्थ्यांचा किलबिलाट, आनंद आणि उत्साह दिसून आला. शाळेत प्रवेश होतेवेळी विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप करण्यात आले.


विद्यार्थ्यांचे स्वागत करून सर्व विद्यार्थ्यांना सन्मानाने पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर, इंदिरा चौधरी, तिलोत्तमा गायकवाड, जयश्री गायकवाड, श्रीधर उमदी, शशिकांत शिर्के, समिधा वेदक, वैशाली करडे, विनोद ओसवाल, सुशिल यादव, सोनाली लहारे, मनस्वी जाधव, मयूर बनकर, अजय करंबे, स्नेहल निजामपूरकर आदि उपस्थित होते.

शाळेत जाताना विद्यार्थ्यांचा उत्साह


पोयनाड येथील शाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी बास्टेवाड यांची हजेरी


शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून पाठ्यपुस्तकांचे वाटप


Exit mobile version