| मुंबई | प्रतिनिधी |
दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या पंचवार्षिक निवडणूकीत यंदा राजकारण रंगणार आहे. आधीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंनी एकत्र येत एक पॅनल तयार केलेले असताना आता ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी महायुतीनेही मोर्चेबांधणी केली आहे. आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मंत्री नितेश राणे आणि माजी आमदार किरण पावसकर यांनी एकत्र येऊन एक पॅनल तयार केले आहे. त्यामुळे यंदा ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी सर्व पातळ्यांवर या राजकारणातील युती आणि आघाड्यांना सुरुवात झाली आहे. त्याचाच प्रत्यय बेस्ट उपक्रमाच्या कामगार पतपेढी निवडणुकीतही येऊ लागला आहे. बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवारी (दि.18) होणार आहे. या निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता येते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. त्यामुळे या निवडणूकीला महत्व आहे. महाराष्ट्रात सद्या ठाकरे ब्रँड चर्चेत आहे. बेस्टचे बहुतांश कामगार, पुढारी, युनियनचे पदाधिकारी बेस्टच्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. कित्येक कर्मचारी हे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत.
ठाकरे बंधूंच्या पॅनेलची घोषणा झाल्यानंतर महायुतीनेही आपले दंड थोपटले आहेत. आमदार प्रविण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी आमदार किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्र येऊन सहकार समृद्धी पॅनलची निर्मिती केली असल्याची माहिती समर्थ बेस्ट कामगार सेनेचे विलास पवार यांनी दिली आहे.
बेस्टची पतपेढीची निवडणूक गाजणार
