। आगरदांडा । प्रतिनिधी ।
संजीवनी आरोग्य सेवा संस्था मुरुडसह म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामीण रुग्णांना डायलिसीससाठी मागील पाच वर्षांपासून सेवा देत असून, मुरुडचे सुपुत्र सनाउल्ला घरटकर यांनी रुग्णवाहिकेसह आतापर्यंत तीन डायलिसीस मशीन्स देऊन संस्थेला मोलाचे सहकार्य केले आहे. संजीवनी आरोग्य सेवेच्या माध्यमातून डायलिसीस रुग्णांना सदैव उत्तमोत्तम सेवा पुरविण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन विभाग प्रमुख डॉ. मकबुल कोकाटे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर संजीवनी संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे, उपाध्यक्ष चंद्रकांत अपराध, विश्वस्त राशीद फहीम, विभागप्रमुख डॉ. मकबूल कोकाटे, ज्येष्ठ समाजसेविका परवीन फहीम, वासंती उमरोटकर, नगमा खानजादे जहूर कादिरी, नितीन अंबुर्ले, अजित गुरव, कीर्ती शहा, शशीकांत भगत, अशोक विरकुड, अमित कवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांनी, संजीवनी संस्थेत एकूण 28 रुग्ण डायलिसीस सेवेचा लाभ घेत असून, संस्थेकडे आजमितीस पाच डायलिसीस मशीन्स आहेत. त्यामुळे एचआयव्ही पॉझिटिव्ह तसेच हेपिटाईस बी या रुग्णांवरदेखील आगामी काळात उपचार होऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी डॉ. सनाउल्ला घरटकर यांनी दिलेल्या आठ लाख रुपये किमतीच्या हिमो डायलिसीस मशीनचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त राशिद फहीम यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमात देणगी स्वरूपात संस्थेस ज्येष्ठ समाजसेविका परवीन फहीम यांनी वॉटर कुलर तसेच राजु जैन यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काटा तर शमीम खतीब यांनी व्हीलचेअर भेट दिली. महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना दिला जात असल्याने या आरोग्य केंद्राकडून गोरगरीबांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मशिन, अंतर्गत सजावटीसाठी एक लाख रुपये अशी 72 लाखांची मदत केली. दिलावर महाडकर यांनी सहा लाखांची मशिन उपलब्ध करून दिली. डायलिसिससाठी आवश्यक आरओ प्रकल्पासह एक मशिन शुयेब डावरे यांनी उपलब्ध केल्याने संस्थेकडे चार मशिन असून, मुख्य तंत्रज्ञ अविनाश भौड, सहायक सुकन्या मोरे, कुणाल सुर्वे, राकेश चोगले आणि गीतांजली डांगे हा सेवाभावी वृत्तीने काम करणारा सेवक वर्ग आहे.
100 बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प
येत्या 23 ऑगस्ट रोजी डॉ. घरटकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून किमान 100 वाटल्या रक्त संकलित करून जिल्हा रक्तपेढीला द्यायचा संकल्प व्यक्त केला आहे. संजीवनी संस्थेतर्फे आगामी काळात सोनोग्राफी, योगा केंद्र, पॅथालॉजी आदी आरोग्य सेवा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.