सावधान! रस्त्यावरील शीतपेयांमुळे आरोग्य धोक्यात

| उरण | वार्ताहर |

उन्हाळा सुरू होताच अंगातील उष्मा कमी होण्यासाठी अनेकांची पावले शीतपेयांकडे वळतात; मात्र ही शीतपेये बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फामुळे पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागत असल्याने आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे रस्त्यावरील बर्फाचे सेवन टाळावे, असे आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.

उन्हाचा पारा चढता असल्याने सध्या शीतपेयविक्रेत्यांची चलती आहे. शहरात उसाचा रस, फळांचा रस, गोळा, सरबत बनवण्याचे व्यवसाय जागोजागी सुरू आहेत. यासाठी वापरण्यात येणारा बर्फ आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे वारंवार दिसून आले आहे. कारण हा बर्फ थेट पाणी किंवा व्यावसायिक टँकरने पुरवठा केलेल्या पाण्यापासून तयार केला जात असल्याने जुलाबाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंच्या संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे दूषित पाण्याने तयार केलेला बर्फ खाल्ल्‌‍याने रोग बळावण्याचा धोका असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.

दूषित पाण्याचा वापर
बाजारात दोन प्रकारचे बर्फ तयार होतात. एक लादी बर्फ आणि दुसरा कांडी बर्फ. यात कांडी बर्फ पाणी फिल्टर आणि शुद्ध पाण्यापासून तयार केला जातो. हा बर्फ विशेषतः खाण्यासाठी वापरतात. त्यामुळे बऱ्याच हॉटेलमध्ये दिसून येतो. मात्र, लादी बर्फासाठी अनेक दूषित पाणी वापरले जात असल्याने शरीरासाठी हा बर्फ अधिक घातक असतो.

Exit mobile version