सावधान! आता कचरा रस्त्यात टाकणे पडणार महागात

| अलिबाग | प्रमोद जाधव |

रायगड जिल्ह्यात वाढत्या कचऱ्यामुळे पर्यावरणावर त्याचा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी अस्ताव्यस्त कचऱ्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता रस्त्यात कचरा टाकणे महागात पडणार आहे. त्या व्यक्तीविरोधात पोलीसांच्या मदतीने दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.याची अंमलबजावणी लवकरच सुरु केली जाणार आहे. त्यामुळे रस्त्यात कचरा टाकताना सावधान बाळगा.

रायगड जिल्ह्यात 810 ग्रामपंचायती, 54 प्राथमिक आरोग्य केंद्र, 288 हून अधिक आरोग्य उपकेंद्र आहेत. 2011 च्या जनगणनेनूसार जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार इतकी असून एक हजार 900हून अधिक गावे, वाड्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागात वाढते पर्यटन व औद्योगिकीकरणामुळे नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. गावांमध्ये लोकवस्ती वाढत असल्याने तेथील कचरा व अन्य सुविधा पुरविणे ग्रामपंचायतीला महागात पडत आहे. जिल्ह्यात कचरा भूमीचा अभाव असल्याने अनेक जण मिळेल त्याठिकाणी कचरा टाकत असतात. काही जण रस्त्याच्या कडेला, तर काही जण शेतांमध्ये कचरा टाकतात. तर काही जण घराच्या परिसराजवळ मोकळ्या जागेत कचरा टाकत असतात.

जिल्ह्यामध्ये वाढत्या पर्यटनाबरोबरच औद्योगिकीकरणामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे तारेवरची कसरत होऊ लागली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी मिशन विभागामार्फत स्वच्छता मोहिम ठिकठिकाणी राबविली जात आहे. कचरा मुक्तीसाठी त्यांच्या मार्फत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. परंतु नव्याचे नऊ दिवस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम गावांतील मानवी आरोग्याबरोबरच पर्यावरण होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्लास्टीक व अन्य कचरा जाळल्याने धुराचा धोका निर्माण होऊन प्रदुषण होण्याची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या आजाराला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे आता कचरा टाकणाऱ्यांविरोधात जिल्हा परिषदेने कडक पाऊल टाकण्याची मोहिम हाती घेतली आहे.

मोठ्या शहरांध्ये ज्या पध्दतीने कचरा रस्त्यात टाकल्यावर पोलीसांमार्फत कारवाई केली जाते. त्या पध्दतीने जिल्ह्यात पोलीसांच्या मदतीने कारवाई होणार आहे. त्याची हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानुसार सुरुवातीला पोलीस व ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांच्या बैठक घेतली जाणार आहे. गावागावात ठिकठिकाणी फलक लावून कचरा न टाकण्याचे आवाहन केले जाणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती यामाध्यमातून केली जाणार आहे. त्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी कचरा टाकणाऱ्यांविरोधात मुंबई पोलीस ॲक्टनुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी आता कचरा टाकताना जरा सावधानता बाळगा असे बोलले जात आहे.

जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी प्रयत्न केला जात आहे. वेगवेगळे उपक्रम राबवून गावांमध्ये जनजागृती केली जात आहे. तरीदेखील काहीठिकाणी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी मिशन मोडवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी व पोलीस अधीक्षक यांच्या सहीचे पत्र दिले जाणार आहे. पोलीसांच्या मदतीने कचरा टाकणाऱ्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.

शुभांगी नाखले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
स्वच्छता व पाणी मिशन, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version