संजय टाकळगव्हाणकर
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात राजकारणाच्या माध्यमातून मोलाचे योगदान देणारी काही मोजकीच राजकीय घराणी आहेत़. त्यापैकी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधिमंडळाचे ज्येष्ठ सदस्य भाई जयंत पाटील यांचा प्रामुख्याने उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते़.
पांढरपेशी समाजातील लेखक व पत्रकार हे कला, संगीत, नाट्य, क्रीडा, न्याय व प्रशासनातील नामांकित व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना त्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीचा उल्लेख मोठ्या गौरवाने करतात व त्यांच्या वंशवळीमुळेच ती व्यक्ती मोठी ठरविली जाते़ पण, या तथाकथित विचारवंतांची वैचारिक मोजपट्टी काही राजकीय व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाची उंची मोजताना का कमी पडावी, हा एक संशोधनाचा व वेगळा विषय आहे़.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत भाई जयंत पाटील यांच्या घराण्याचे मोठे योगदान आहे़. शेतकरी कामगार पक्ष व जयंत भाई यांनी महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये त्यांनी दिलेले योगदान अलीकडील तरुण पिढीला ज्ञात नाही, म्हणून शेकापची स्थापना कोणत्या ध्येयाने प्रेरित होऊन झाली, याचा इतिहास तमाम मराठी तरुण पिढीला व्हावा, म्हणून हा छोटाशा प्रयत्न आहे़.
काँग्रेसची स्वातंत्र्य चळवळ गांधीयुगाआधी मूठभर समाज नेत्यांची होती़ सर्वसामान्य भारतीयांचा या संघटनेशी जवळचा संबंध नव्हता़ त्यावेळी महाराष्ट्रात महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाज चळवळीचा मोठा दबदबा होता़ आधी सामाजिक स्वातंत्र्य व नंतर राजकीय स्वातंत्र्य अशी भूमिका सत्यशोधक मंडळींची होती़ देशस्तरावर महात्मा गांधींच्या वचनास बांधील होऊन महाराष्ट्रातील सत्यशोधक मंडळी ‘आधी परकीयांपासून स्वातंत्र्य मिळवू व नंतर सामाजिक सुधारणा करु’ या महात्मा गांधींच्या तत्त्वावर म़ गांधींसमवेत स्वातंत्र्य संग्रामात सामील झाली़ यामुळे स्वातंत्र्य संग्रामास व्यापक रुप आल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले़ स्वातंंत्र्यानंतर कष्टकरी, शेतकरी, उपेक्षित यांचे राज्य येईल, अशी आशा होती़ पण, त्यांचा अपेक्षाभंग झाल्याने सत्यशोधक व इतर अग्रणी नेत्यांनी काँगे्रससोबत फारकत घेतली व नंतर महाराष्ट्रात सत्यशोधक मंडळींनी ‘शेतकरी कामगार पक्षा’ची स्थापना सन 13 जून 1948 मध्ये केली़ यामध्ये केशवराव जेधे, शंकरराव मोरे, भाऊसाहेब राऊत, नाना पाटील, तुळशीदास जाधव, दाजीबा देसाई, माधवराव बागल, दत्ता देशमुख इत्यादी नेत्यांबरोबर जयंतभाईंचे आजोबा नागू पाटील यांचाही समावेश होता़
रायगड जिल्हा हिंदुस्तानातील क्रांतिकारी व राष्ट्रवाद तसेच मराठी अस्मितेचे स्फुलिंग चेतावणार्या महान योद्ध्यांच्या जन्मभूमीचा, कर्मभूमीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो़ या रायगड जिल्ह्यामध्ये दिल्ली तख्तास हादवणारर्या मराठी सत्तेची राजधानी आहे़ तसेच हजारो वर्षांची सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी व सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांनी निवड केलेले चवदार तळे (महाड) ही याच भूमीत येते आणि तद्वतच भारतातील शेतकर्यांसाठी त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकर्यांचा देशातील पहिला सत्याग्रह करणारे नागू पाटील (जयंत पाटील यांचे आजोबा) यांचाही जन्मभूमी जिल्हा रायगडच आहे़ जयंतभाई यांचे काका आ़ दत्ता पाटील हे त्या वेळेचे विरोधी पक्षनेते होते़ तसेच त्यांच्या भगिनी माजी मंत्री मीनाक्षी पाटील याही पुरोगामी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री होत्या़ तसेच जयंतभाई यांचे वडील रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना त्यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत मोठे सामाजिक कार्य केले़ त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा प्रभाव जयंतभाई यांच्यावर होता़ महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अस्तित्वापासून जयंतभाई यांच्या घराण्यात विधिमंडळाचे प्रतिनिधीत्व होते़ म्हणून अशा या क्रांतिकारी भूमीत जन्मलेल्या भाई जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे सामाजिक विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरवले आहेत़ जयंतभाई यांनी हा नवा राजकीय आदर्श शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणात उभा केला आहे़ त्यांनी शैक्षणिक, सहकार व अर्थ चळवळीतून सर्वसामान्य कष्टकर्यांना स्वाभिमानाने जगण्याचा व शेतकर्यांच्या-कुणब्यांच्या मुलांना केवळ राजकारणातच नव्हे, तर उद्योग, भांडवली व व्यावसायिक म्हणून स्वाभिमानाने उभे केले आहे़ जयंतभाई यांच्या रक्तातच क्रांतीची बीजे आहेत़ त्यांची राजकीय जडणघडण त्यांचे आजोबा, वडील व त्यांचे काका यांच्या सामाजिक, राजकीय विचारांतून झाली़ म्हणून कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार यांचे प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर सातत्याने राहतात़ या कष्टकरी वर्गाने राजसत्ताच नव्हे तर, अर्थसत्तासुद्धा ताब्यात घेतली पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न असतो़.
रायगड जिल्हा व परिसरात भाईंनी सामाजिक, आर्थिक क्रांती केली आहे़ रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक ही भारतातील सहकार बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट मॉडेल मानले जाते़ देशात शेतकर्यांच्या, कष्टकरांच्या नावाने अनेक पक्ष राजकारणात आले व ते सध्या कार्यरत आहेत़ अनेक राज्यांत या कष्टकर्यांच्या पक्षांची सत्ता होती़ कष्टकर्यांच्या नावाने या पक्षाने अनेक संघर्ष केले़ पण, कष्टकर्यांच्या जीवनात कोणताही बदल झाला नाही़ पण, जयंतभाई यांनी राजकारणाच्या माध्यमातून अनेक बंद साखर कारखाने स्वत: चालविण्यास घेऊन महाराष्ट्रातील कामगाराच्या हातास काम दिले़ महाराष्ट्रातील राजकारणाच्या संख्याबळाच्या बाबतीत शेकापची स्थिती काही असो; पण राज्याचे राजकारण जयंतभाईंशिवाय पूर्ण होत नाही, हेच जयंतभाईंच्या राजकीय शक्तीचे गुपित (गनिमीकावा) आहे़ आज शेकापच्या अस्तित्वाबद्दल बोलले जात आहे़ शेकापने अनेक वेळा राजकीय तडजोड्या केल्या़ सत्तेत पण सहभाग होता़ पण, त्यांनी शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताच्या आड येणार्या निर्णयावर सत्तेशी कधीही तडजोड केली नाही़ शेतकर्यांच्या व कष्टकर्यांच्या हितासाठी जयंतभाईंचा संघर्ष आजही अविरत चालू आहे़ जयंतभाई यांची राजकारणातील व समाजकारणातील कष्टकर्यांबाबतची भूमिका एकीकडे, तर दुसरीकडे एक उद्योगपती अशी असल्याने प्रस्थापित व्यवस्थेला जयंतभाई उद्योगपती कसे होऊ शकतात? हा प्रश्न सातत्याने पडत असतो़ असाच प्रश्न 16 व्या शतकातही प्रस्थापित समाजाला कुणब्याचा छत्रपती राजा कसा होऊ शकतो, असा पडला होता़.
रायगडाच्या मातीत कुणब्याचा राजा झाला. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर जाऊन शोधून त्यांचा इतिहास जगासमोर आणला़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनातून हजारो वर्षांची अस्पृश्यता, गुलामगिरी नष्ट झाली़ त्याचप्रमाणे नागू पाटील यांनी शेतकर्यांसाठी पहिला सत्याग्रह करुन शेतकर्यांच्या अन्यायाविरुद्ध हुंकार फुकला़ त्याच रायगडाच्या मातीत क्रांतिकारी भूमीत जयंत पाटील यांनी प्रस्थापित भांडवलदारांना त्यांची जागा दाखवली व कष्टकरी जनतेला श्रमाचा व जमिनीचा न्याय दिला़ जयंतभाई यांनी अपार कष्टाने महाराष्ट्राच्या राजकारणाबरोबरच उद्योग क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला़ त्याचबरोबर अनेक कुणब्यांच्या व शेतकर्यांच्या मुलांना उद्योगपती, व्यावसायिक म्हणून उभे केले़ आज जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या राजकीय चळवळीचे मूल्यमापन आमदार, खासदार व इतर पदाधिकार्यांच्या संख्येवर करता येणार नाही़ भाईंनी जी आर्थिक क्रांती रायगड व परिसरात शेकापची निष्ठा राखून केली आहे, त्याची दखल सत्तेवर असलेल्या कोणत्याही पक्षाला घ्यावीच लागते, ही भाईंची राजकीय किमया आहे़.
देशात कोरोना संकटाने श्रमिक, कष्टकर्यांचे जीवन असहाय्य झाले असताना, कोरोनासंकटात जयंतभाईंनी शासनाच्या मदतीविना मोठे कार्य केले आहे़ चीनरुपी कोरोना, परकीय आक्रमण व कोकणात अभूतपूर्व ‘निसर्ग’ वादळाचा सामना करणारे भाई जयंत पाटील व शेकापचे तमाम कार्यकर्त्यांनी अद्वितीय कामगिरी करुन देशावरील अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदाराप्रमाणे एक उदाहरण महाराष्ट्रासमोर किंबहुना देशासमोर पुन्हा एकदा सिद्ध केले आहे़.
काही वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून ते राष्ट्रहितासाठी, समाजाच्या हितासाठी असते, याचे उदाहरण देऊन राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मा़ शरदचंद्र पवार यांचा गुणगौरव केला होता़ भारतीय राजकारणात राष्ट्रहित व समाजहिताचा गाभा हा महाराष्ट्रात शेकापने निर्माण केला आहे़ शरद पवार असो की जयंत भाई असो, यांची नाळ ही शेकापचीच आहे़ म्हणून देशाच्या अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करण्याचे सामर्थ्य केवळ रायगडाच्या सुपुत्रातच आहे़ म्हणून देशाच्या व राज्याच्या संकटसमयी जयंतभाई पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाची खरी गरज आहे़ म्हणून जयंतभाई पाटील हेच खरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाचे वारस ठरतात़.






