बागमळा येथे रंगणार डबलबारीचा सामना

रविवारी महालक्ष्मी मंदिरात भजनांचे आयोजन; नामवंत भजन मंडळांची उपस्थिती

| चौल | प्रतिनिधी |

नवरात्रोत्सवानिमित्त बागमळा येथील मंदिरात जागर सुरू आहे. त्यानिमित्ताने मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, रविवार, दि.18 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता महालक्ष्मीच्या मंदिरात डबलबारी भजनांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवसाला पावणाऱ्या आणि हाकेला धावणाऱ्या महालक्ष्मीवर चौलमळा येथील महालक्ष्मीचे भक्त अनंत लक्ष्मण घरत यांची खूप श्रद्धा आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात ते डबलबारी भजन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करून नवरात्रोत्सवात रंगत आणत असतात. यावर्षीसुद्धा डबलबारी भजनाचे जंगी सामने आयोजित करण्यात आले आहेत.

यंदा जय हनुमान प्रासादिक भजन खारीकवाडा, नांदगाव आणि श्री गोकुळेश्वर प्रासादिक भजन मंडळ, वेश्वी, ता. अलिबाग यांच्यात डबलबारी भजनांचा सामना रंगणार आहे. जय हनुमान प्रासादिक भजन खारीकवाडा, नांदगाव यांच्याकडून बुवा अजय दामोदर राऊत, पखवाजासाठी सागर राऊत आणि तबला वादक म्हणून केशव राऊत साथ देणार आहेत. अजय दामोदर राऊत हे गुरुवर्य भगवान लोकेरे, कृष्णा देशमुख आणि शंकर राऊत यांचे शिष्य आहेत. तर श्री गोकुळेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने रायगड भूषण निलेशबुवा जंगम बुवांच्या भूमिकेत असतील. त्यांना वादनकार म्हणून महेश ठाकूर आणि विजय घरत यांची साथ लाभणार आहे. तर मगर गुरुजी व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत. या मंडळाचे संस्थापक दामोदर सिताराम मगर आहेत.

अनंत लक्ष्मण घरत यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बागमळा-चौलमळा मित्रमंडळ जोरदार तयारी करीत आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त भजनप्रेमींनी उपस्थित राहून भजनांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे

Exit mobile version