| चणेरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील भंडारवाडा येथे काळभैरव मंदिरात सर्वात मोठ्या प्रमाणात कीत्ते भंडारी समाजातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अश्वारूढ काळभैरवाची भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गेली 150 वर्षांपासून ही परंपरा भंडारी समाजातर्फे जपण्यात येत आहे. यानिमित्ताने दर्शनासाठी व प्रसादासाठी हजारो भाविकांनी लाभ घेतला.
शहरातील कालभैरव मंदिरात कित्ते भंडारी समाजातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने आष्टमीच्या सात दिवस आधी सप्ताह बसवला जातो. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी श्री काळभैरवच्या भव्य अश्वारूढ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. या निमित्ताने आठवडाभर टाळ व मृदुंगाचा नाद करण्यात येतो. यावेळी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. श्री कालभैरव मंदिरात 150 वर्षापासून ही परंपरा जपण्यात येत आहे. पुर्वी मुख्य गाभाऱ्यात श्री काळभैरवाच्या मूर्तीला शाडू मातीचे लेप देऊन मुर्तीकार सिताराम जंजिरकर हे सजवायचे. कालांतराने त्यानंतर 40 वर्षापासून मुर्तीकार वसंत जंजीरकर यांनी समाजाला कल्पना सुचविली. समाजाला ही संकल्पना आवडली .त्या संकल्पेनेतून ही भव्य अश्वारूढ श्री काळभैरव मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.