| कल्याण | वृत्तसंस्था |
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन देण्याचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. वन विभागाची मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील 129 हेक्टर जमीन या प्रकल्पात बाधित होत होती. केंद्र, राज्य शासनाने बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वन विभागाची जमीन वळती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्यकाळात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील जमीन संपादनाचे प्रस्ताव रोखून ठेवण्यात आले होते. शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच त्याला गती दिली. त्यानुसार, महसूल आणि वन विभागाने वन विभागाच्या जमीन वळतीकरणाला जुलैमध्ये मंजुरी दिली. ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई भागातील घणसोली, म्हापे, अडवली, भुतावली, शीळ, आगासन, म्हातार्डी, भिवंडी तालुक्यातील भरोडी, दिवे, अंजूर, कशेळी, काल्हेर, कोपर, केवणी, खारबाव, मालोडी, पायेगाव, पाये आदी गावांतील जमीन यासाठी जाईल.