भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना

जिल्ह्यात 13 हजार 182 लाभार्थी
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, माता व बालमृत्यू रोखणे या मुख्य उद्देशाने राज्याच्या आदिवासी विभागाच्या वतीने महिला व बालविकास विभागाच्या समन्वयाने भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत गरोदर महिला, स्तनदा माता व 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके अशा एकूण 13 हजार 807 लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील कर्जत, पेण, पनवेल, रोहा, खालापूर, सुधागड या सहा तालुक्यांमध्ये भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. अंगणवाडीत गरोदर महिलेची नोंद झाल्यापासून तिचे जन्मलेले बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत आठवड्यातील सहा दिवस चौरस आहार असलेले एक वेळचे जेवण देण्याची तरतूद, तसेच सहा महिने ते सहा वर्षांपर्यंतच्या मुलाला दररोज एक उकडलेले अंडे देण्याची तरतूद या योजनेत आहे.

आहाराचे स्वरूप
या योजनेंतर्गत देण्यात येणार्‍या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दूध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल. तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक अशी चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल. या समितीला आहार घटक खरेदी करण्याचे अधिकार राहतील.

योजनेतील लाभार्थी दृष्टीक्षेप
योजनेंतर्गत येणारे तालुके : 6
प्रकल्प संख्या : 8
अंगणवाड्या : 283
गरोदर महिला : 1 हजार 124
स्तनदा माता : 1 हजार 54
7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके : 11 हजार 611

कुपोषणावर मात करण्यासोबतच माता व बालमृत्यू रोखणे हे अमृत आहार योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आवश्यक त्या सूचना प्रकल्प तसेच अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आल्या आहेत.
डॉ. किरण पाटील- मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप

या योजनेंतर्गत समाविष्ट भागात गरोदर माता, स्तनदा माता, सहा वर्षांपर्यंतची बालके यांना नियमितपणे आहार देण्यात येत असून, नियमितपणे योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जात आहे. तसेच जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी योजनेसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे.
गीता जाधव, सभापती, महिला व बालकल्याण समिती, राजिप

Exit mobile version