| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सचिव योगेश भस्मे याच्याविरोधात दाखल गुन्ह्याचा तपास सखोल करण्यासाठी न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. शनिवारी (दि. 26) पुन्हा न्यायालयात हजर केले असता, 28 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुधागड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत बदली करून देण्यासाठी साहेबांना सांगून काम करून देतो, असे सांगत अध्यक्ष जि.प. मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सचिव योगेश भस्मे याने दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी अलिबागमधील समाधान हॉटेलमध्ये सापळा रचून लाच स्वीकारताना भस्मेला रंगेहाथ पकडले. त्याला ताब्यात घेऊन अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक सरिता भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार यांच्या शिक्षक पत्नीची तळा तालुक्यातील वाशी हवेली येथील जिल्हा परिषद शाळेऐवजी सुधागड तालुक्यातील पाली येथील जिल्हा परिषद शाळेत बदली करण्याचे आश्वासन भस्मेने दिले होते. ओळखीने साहेबांना सांगून बदली करून देण्यासाठी त्याने दीड लाख रुपयांची लाच स्वीकारली होती.
शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले होते. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील ॲड. संतोष पवार यांनी युक्तिवाद करून सखोल चौकशीसाठी कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने घटनेचे गांभीर्य ओळखून भस्मेच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ केली असून, सोमवारी (दि. 28) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या दोन दिवसांच्या कालावधीत भस्मेची घरझडतीही घेण्यात आली आहे. मात्र, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून याबाबतची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
सखोल चौकशीसाठी भस्मेच्या कोठडीत वाढ
