। पेण । प्रतिनिधी ।
माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पेण नगरपरिषद हद्दीतील भोगावती नदीमध्ये वाढलेली जलपर्णी काढण्यासाठी 25 कंत्राटी सफाई कामगार यांच्या मदतीने 2 ट्रॅक्टर घेवून व कचरा ट्रॉली घेवून 15 ते 20 टन नुकतीच जलपर्णी कढण्यात आली.
पेण नगरपरिषदेमार्फत अशाच प्रकारे स्वच्छता अभियान सातत्याने राबविण्यात येत आहे. यासारखेच अभियान 2 महिन्यापूर्वी घेतले असून त्यावेळीही नदीतून जलपर्णी काढण्यात आली होती. परंतु जलपर्णीमध्ये झपाटयाने वाढ होत असून पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे आत्ता परत पेण नगरपालिकेतील 25 कंत्राटी सफाई कामगार यांच्या मदतीन 15 ते 20 टन जलपर्णी काढण्यात आली. याकरिता 2 ट्रॅक्टरच्या मदतीने सदर जलपर्णी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे वाहून नेण्यात आला.
सदर अभियान मुख्याधिकारी जवीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवून सदर अभियानास किरण शहा, लेखापाल, अंकिता इसळ, आरोग्य अभियंता शिवाजी चव्हाण, आरोग्य निरीक्षक महेश वडके, नगरपरिषदेचे कर्मचारी व सर्व मुकादम उपस्थित होते. त्यांच्या या अभियानाबाबत पेण च्या नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.