। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग आता सुखकर झाला आहे. कारण पालीत ग्रामीण रुग्णालय मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थाने बांधकामासाठी 20 कोटी 27 लाख रक्कम खर्च करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (ता.29) पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने तसेच पाली नगरपंचायत नगराध्यक्षा गीता पालरेचा, हभप महेश पोंगडे महाराज, व विविध पक्षीय स्थानिक नेते व लोकप्रतिनिधी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभे राहत आहे. यामुळे सुधागड तालुक्यातील आदिवासी व गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरीकांच्या आरोग्य व उपचारासाठी अद्ययावत सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.
भूमिपूजन कार्यक्रमावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुधागड तालुकाध्यक्ष रमेश साळुंखे, माजी जि.प.सदस्य सुरेश खैरे, उपनगराध्यक्ष आरिफ मनियार, शिवसेना नेते राजेंद्र राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष संदेश शेवाळे, साक्षी दिघे, नगरसेविका नलिनी म्हात्रे, नगरसेवक सुलतान बेनसेकर, सुधीर भालेराव, सुधाकर मोरे, हभप महेश पोंगडे महाराज, समन्वय समिती अध्यक्ष अभिजीत चांदोरकर, सरपंच साधुराम साजेकर, तहसीलदार दिलीप रायन्नावार, गटविकास अधिकारी विजय यादव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत मढवी, आरोग्य कर्मचारी, सा.बां.विभागाचे अधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.