सायकल वाटपामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती
। कोर्लई । वार्ताहर ।
मुंबईच्या कॅनरा रोबेको व इनर्व्हील कंपनीतर्फे प्रसिद्ध उद्योजक हितेन रमणलाल माहिम तुरा व सरपंच संतोष राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून मुरुड तालुक्यातील काशिद येथील जंजिरा विद्या मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
मुंबई-कॅनरा रोबेको कंपनीच्या प्रमुख एच.आर.उपासना साबू, इनर्व्हील क्लब ऑफ पायर अध्यक्षा निशरीन शुम्स, उपाध्यक्षा मुनिरा काथवाला, मारीयाह लोखंडवाला, ज्ञानसागर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय शिंदे, उपाध्यक्ष अंकुश चाचे, नरेश धार्वे, नंदकुमार काते, चंद्रकांत कासार, रमेश कासार, निलेश दिवेकर, सुशिल खोपकर, सुर्यकांत जंगम, दिपेश काते, विशाल खेडेकर, ग्रामसेवक सुशांत ठाकूर, प्रशांत खेडेकर, प्रकाश नांदगावकर, रोहन खेडेकर, मुख्याध्यापक किशोर गंभे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
कॅनरा ही एक अग्रगण्य बँक असून शेअर पैशांच्या देवाणघेवाणीत तिची उलाढाल असते व सामाजिक सेवेत उपक्रम राबवित असते.त्याचाच भाग मुरुड तालुक्यातील माध्यमिक विद्यालय काशिदमधील विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येत असून यामुळे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपली प्रगती साधावी.असे कॅनरा रोबेको कंपनीच्या प्रमुख एचआर उपासना साबू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.