| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी खूशखबर असून मोदी सरकारने मंगळवारी (दि.29) आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत गॅस सिलिंडरच्या दराबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारने गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी मंजूर केली आहे, म्हणजेच आतापासून तुम्हाला गॅस सिलिंडर स्वस्तात मिळणार आहे. सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलिंडर 200 अतिरिक्त अनुदान मंजूर करण्यात आले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारवर सुमारे 7500 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. गॅस सिलिंडरच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, ऑगस्टच्या पहिल्या तारखेला दिल्लीत घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमत 1103 रुपये होती. त्याचवेळी, मुंबईत गॅस सिलेंडरची किंमत 1102.50 रुपये, कोलकातामध्ये 1129 रुपये आणि चेन्नईमध्ये 1118.50 रुपये आहे.
मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्याचबरोबर, कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत अनेक वेळा चढ-उतार झाले आहेत.
केंद्र सरकारने 2016 मध्ये देशभर उज्ज्वला योजना सुरु केली होती. या योजनेंतर्गत, लाभार्थी एका वर्षात एकूण 12 सिलिंडरवर अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. शासकीय योजनेंतर्गत दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शनची सुविधा मोफत मिळते.