| तळा | वार्ताहर |
तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्या माधुरी शैलेश घोलप यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचा नगराध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाच्या कालावधीनंतर नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी प्रांताधिकारी संदीपान सानप यांच्या अध्यक्षतेखाली दि.4 सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर केली होती. यासाठी मंगळवार, दि.29 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माधुरी घोलप यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला तसेच अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित राहिल्याने नगराध्यक्ष पदाची माळ आपसूकच माधुरी घोलप यांच्या गळ्यात पडली आहे. केवळ त्यांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, मुख्याधिकारी माधुरी मडके यांसह सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.