। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देवमाणूस पण त्यांच्या भोवतीचे लोक त्यांना काहीच सुचू देत नव्हते. त्यामुळे शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागत होता, असा खळबळजनक दावा बुलढाण्याचे बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. तसेच, संजय राऊत यांच्यावरही गायकवाड यांनी टीकास्त्र डागलं आहे. संजय राऊत हेच राष्ट्रवादीची सुपारी घेऊन संपूर्ण शिवसेना संपवायला निघाले होते, असा खळबजनक आरोप संजय गायकवाड यांनी केले आहे.
राज्यात गेले अनेक दिवस सत्तासंघर्ष सुरु होता. काल शिंदे-फडणवीस सरकारनं बहुमत सिद्ध केलं आणि अखेर या नाट्यावर पडदा पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह 21 जूनच्या रात्री बंड केलं होतं. त्यानंतर शिवसेनेतील एकापाठोपाठ एक आमदार शिंदे गटात सामील झाले आणि अखेर शिंदे गटानं भाजपसोबत जात राज्यात सरकार स्थापन केलं.
शिंदे आणि फडणवीस सरकारनं विधानसभेत बहुमत सिद्ध करुन दाखवलं. शिंदे गटातील बंडखोर आमदार, अपक्ष आणि भाजपचे आमदार यांनी नवं सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडीचे आमदार वेळेत न पोहोचल्यानं 100 चा आकडाही गाठता आला नाही. शिंदे-फडणवीस सरकारला 164 सदस्यांचा पाठिंबा मिळाला तर मविआला 99 सदस्यांचा पाठिंबा होता. शिवसेनेच्या आणखी एका आमदाराला गळाला लावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला.