| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
यंदाच्या आयसीसी टी-20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. भारताने 8 पैकी 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला 68 धावांनी धूळ चारुन अंतिम सामन्यात धडक मारली. भारत अंतिम सामन्यात पौहचण्यामागे कर्णधार रोहित शर्माचे मोलाचे योगदान राहिले आहे. तत्पूर्वी माजी खेळाडू सौरव गांगुलीने एक मोठा खुलासा केला आहे.
सौरव गांगुली म्हणाला की, रोहितने दोन विश्वचषकातील अंतिम फेरी खेळली आहे. यावरुन त्याचे नेतृत्वगुण दिसून येतात. त्याच्या यशाबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. कारण मी बीसीसीआय अध्यक्ष असताना तो कर्णधार झाला होता. त्यावेळी विराट कोहली कर्णधारपद सांभाळू इच्छित नव्हता. परंतु, रोहित कर्णधार होण्यासाठी तयार नव्हता. त्याला कर्णधार बनवण्यासाठी आम्हा सर्वांना खूप मेहनत घ्यावी लागली आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची प्रगती पाहून मला खूप आनंद झाला.
पुढे बोलताना सौरव गांगुली म्हणाला, रोहितच्या नावावर 5 आयपीएल चषक जिंकण्याचा विक्रम आहे. ही त्याच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. आयपीएल चषक जिंकणे कधी कधी अवघड असते. मला चुकीचे समजू नका, मी असे म्हणत नाही की आयपीएल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा चांगले आहे. परंतु, आयपीएल चषक जिंकण्यासाठी तुम्हाला 16-17 सामने जिंकावे लागतात. तेव्हा तुम्ही आयपीएलचे विजेतेपद मिळवता.