राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निवडणूक आयोगाला टीकेचं लक्ष्य करत आहेत. एकीकडे बिहारमधील मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्येही मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचा आरोप ते सातत्याने करत होते.
दरम्यान, आज राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील मतदानामध्ये झालेल्या घोटाळ्याचे पुरावे सादर केले आहेत. पत्रकार परिषदेमधून महाराष्ट्रातील मतदानामध्ये झालेल्या घोटाळ्याच्या पुराव्यांचं सादरीकरण करताना राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीमध्ये चोरी झाली. महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक हरलो. महाराष्ट्रामध्ये सुमारे 40 लाख मतदार रहस्यमय आहेत. येथे पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक नवे मतदार नोंदवले गेले. या मतदार यादीबाबत निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे. हे मतदार खरे आहेत की खोटे हे निवडणूक आयोगाने सांगितले पाहिजे.
राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोग आम्हाला इलेक्ट्रॉनिक डेटा का देत नाही. आम्ही निवडणूक आयोगाकडे वारंवार आकडेवारीची मागणी केली आहे. मात्र, आम्हाला ती दिली गेली नाही. एवढंच नाही तर निवडणूक आयोगाने आम्हाला उत्तर देण्यास नकार दिला आहे, असा आरोप ही राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले की, देशामध्ये बनावट मतदान होत आहे. आम्हाला ही चोरी पकडण्यात बराच काळ लागला. या मतदार यादीमध्ये अनेक लोकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीही लिहिण्यात आलेलं आहे. मतदार यादीत अनेक घरांचा पत्ता शून्य आहे. डुप्लिकेट मतदारांची संख्या खूप अधिक आहे. 11 हजार संशयित असे आहेत, ज्यांनी तीन तीन वेळा मतदान केलं आहे. हे लोक कुठून येत आहेत. एकाच पत्त्यावर 46 मतदार असल्याचं समोर आलं आहे.
24 तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र देण्याचे आदेश
गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाला सातत्याने लक्ष्य करत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे पत्रकार परिषदेमधून प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा दावा केला होता. दरम्यान, या दाव्यानंतर कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे.मतदार यादीत अपात्र मतदारांचा समावेश आणि पात्र मतदारांना हटवण्याबाबत केलेल्या आरोपांबाबत सहीनिशी शपथपत्र सादर करण्याचे आदेश कर्नाटक निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना शुक्रवारी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.दरम्यान, महाराष्ट्रात मतांची चोरी झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील लोकसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकमध्येही मतांचा घोटाळा झाला आहे.
