अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.15) पहाटे सायन-पनवेल मार्गावर सीबीडी बेलापूर येथील खिंडीत घडली आहे.

सीबीडी पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भोला उर्फ कृष्णकुमार उमेश शर्मा (28) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर जखमी झालेल्या सहकाऱ्याचे नाव मनिभूषण गोपाल मिश्रा (24) असे आहे. हे दोघेही उलवे सेक्टर-2 मध्ये राहण्यास होते. सोमवारी रात्री हे दोघेही कामानिमित्त मुंबईला गेले होते. त्यानंतर पहाटे दोघेही दुचाकीवरून पनवेलच्या दिशेने जात होते. मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास त्यांची दुचाकी सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी येथील खिंडीच्या अगोदर उरण फाट्यावरील ब्रिज संपतो त्या ठिकाणी आली असताना, पाठीमागून आलेल्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी होऊन खाली पडले. यातील भोला शर्मा याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सीबीडी पोलिसांनी या अपघातात जखमी झालेल्या मनिभूषण मिश्रा याला अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी या अपघातात मोटारसायकलला धडक देऊन पळून गेलेल्या अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version