भाजपच्या खासगी संस्थांवर कोट्यवधींची उधळपट्टी; रायगडकरांच्या नशिबी उपेक्षाच
। जेएनपीटी । अनंत नारंगीकर ।
जेएनपीटीच्या सीएसआर फंडातील कोट्यवधी रुपयांची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली जात आहे. मागील पाच वर्षात स्थानिकांच्या मागणीनंतरही रायगड जिल्ह्यातील दोन संस्थांना देण्यात आलेला 55 लाखांचा निधी वगळता जेएनपीटीने अन्य कोणताही खर्च केलेला नाही. तसेच उरण वगळता नागपुर, पुणे, वर्धा, जालना येथील भाजप आणि आरएसएस सबंधित काही संस्थांना कोट्यवधी रुपयांच्या खिरापती वाटल्याची गंभीर बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस आली आहे.
जेएनपीटी बंदराची 1989 साली उभारणी झाल्यापासूनच कमी अधिक प्रमाणात सीएसआर फंड वापरण्यास सुरुवात झाली आहे. बंदराच्या एकूण वार्षिक नफ्यातून दोन टक्के रक्कम सीएसआर फंडात जमा होते. या सीएसआरच्या रिझर्व फंडातूनच सामाजिक कामांसाठी निधी वाटप करण्यात येत असल्याचे जेएनपीटी अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र सीएसआर फंडाच्या निधी वाटपात राजकारण केले जात असल्याचा गंभीर आरोप येथील राजकीय पुढार्यांकडून सातत्याने केला जात आहे.
नितीन गडकरी केंद्रीय नौकानयन मंत्रीपदाचा भार सांभाळत असताना 2016 ते 2019 या दरम्यानच्या काळात रायगड जिल्ह्याबाहेरच सर्वाधिक 50 कोटींहून अधिक निधी वाटप करण्यात आला आहे. यामध्ये भाजप आणि आरएसएस प्रणीत खासगी सामाजिक संस्थांनाही कोट्यवधी रुपयांच्या खिरापती वाटण्यात आल्या आहेत. यामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टी (छत्रपती ) प्रतिष्ठानसाठी 5 कोटी, नागपुर येथील माधव नेत्रालय आय इनस्टीट्युट अॅण्ड रिचर्स सेंटरसाठी 5 कोटी, श्री भवानी माता सेवा समितीला 5 कोटी तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान-औरंगाबाद या संस्थेला 5 कोटी, हनुमान क्रीडा प्रसारक वा बहुउद्देशीय मंडळ 5 लाख, गुलशन फाऊंडेशन 10 लाख 80 हजार, वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र दिड कोटी, शुश्रुषा सिटिझन को-ऑप हॉस्पीटल लिमिटेड 1 कोटी, सर्च-नागपुर 5 कोटी आणि इतर काही खासगी संस्थांनाही कोट्यांवधीचा निधीं वाटप केला गेला असल्याची बाब माहितीच्या अधिकारातून उघडकीस आली आहे.
केंद्रात नव्याने नौकानयन मंत्रीपदाचा भार सांभाळलेल्या मनसुख मांडवीयानंतरही एप्रिल 2020 ते मार्च 2021 दरम्यानही पीएम केअरफंडासाठी 16 कोटी 40 लाख, सद्भावना ग्रामीण विकास संस्था 80 लाख, नागपूर गुजराती मंडळ 19.74 लाख, डॉ.श्याम प्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर 19.61 लाख, राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर 40 लाख, शिवीर सामाजिक विकास संशोधन सेवा संस्था कोल्हापूर 10 लाख, डॉ.दळवी मेमोरियल हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर नागपूर 20 लाख, सुहित जीवन ट्र्स्ट रायगड 35.03 लाख, जन शिक्षण संस्थान रायगड 20 लाख यांना सीएसआर फंडाचा निधी देण्यात आला आहे. तसेच रायगड जिल्हा वगळता 2016 ते 2019 या दरम्यान राज्यातील नंदुरबार, उस्मानाबाद, वासिम, जालना, यवतमाळ, सोलापूर, औरंगाबाद, पुणे, लातूर, वर्धा, अमरावती, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांत सुमारे 15 कोटी निधींचा वाटप करण्यात आला आहे.
जेएनपीटी बंदर ज्या शेतकरी,भुमीपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर उभे राहिले आहे, त्या उरणकरांसाठी जेएनपीटी कोणत्याही प्रकारचा खर्च करण्यास तयार नाही. उरणकरांना अद्ययावत रुग्णालय उभारणीसाठी, साडेबारा टक्के भुखंड विकसीत करण्यासाठी, जेएनपीटी हद्दीतील 18 ग्रामपंचायतींना मालमत्ता कर भरण्यासाठी आणि इतर विकासाची कामे करण्यासाठी आवश्यक निधी मिळावा, यासाठी स्थानिक सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी जेएनपीटीकडे अनेकदा मागणी केली आहे. मात्र जेएनपीटी सीएसआर फंडाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधींचे वाटप उरणकर भुमीपुत्रांना डावलून अन्य जिल्हयात केले जात आहे.
जेएनपीटीच्या या गलथान, अनागोंदी आणि गैरव्यवहाराबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे लेखी तक्रार करुन चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच जेएनपीटीच्या सीएसआर फंडाच्या अनियमित निधी वाटपाची तक्रार करुन व्हिजिलन्स विभागाकडून चौकशी करण्याची मागणीही विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी याआधीच केली आहे.
याप्रकरणी जेएनपीटी प्रशासनाचे वरिष्ठ व्यवस्थापक एन.के.कुलकर्णी यांनी असमर्थता व्यक्त करत माहिती देण्यास स्पष्टपणे नकार दिला. माहिती हवी असल्यास माहितीच्या अधिकाराखाली मिळवावी, अशी सूचनाही केली.