नेरळ ग्रामपंचायत आक्रमक; संबंधितांवर गुन्हा दाखल होणार
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ गावात आरोग्य सेवा देणारे रुग्णालय आणि पॅथॉलॉजी लॅब यांच्यामधील वापरात आलेला जैव वैद्यकीय कचरा (मेडिकल वेस्ट) योग्य विल्हेवाट न लावता रस्त्याच्या बाजूला, गटारामध्ये किंवा कचरा कुंडीत टाकण्यात येत आहे. वैद्यकीय उपचारात निर्माण होणारा हा कचरा सर्वाधिक घातक आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नेरळ ग्रामपंचायतीकडून सर्व वैद्यकीय डॉक्टर आणि पॅथालॉजी यांना लेखी पत्र देऊन यापुढे रस्त्यावर कचरा आढळून आल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
ग्रामपंचायत नेरळ हद्दीत असलेल्या आरोग्य यंत्रणा यांच्याकडून नाल्यात, गटारात, कचरा कुंडीत वापरलेले जैव कचरा टाकून देण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यात नेरळ ग्रामपंचायतीमधील सर्व कचऱ्यावर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे प्रक्रिया केली जाते. त्यावेळी गावातून उचलण्यात येत असलेला कचरा हा स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी उचलून कचरा गाडीत टाकत असतात. मात्र, कचरा उचलणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून याची समस्या भेडसावत आहे. असा कचरा उचलताना ग्रामपंचायत कर्मचारी जखमीदेखील झाले आहेत. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.
नेरळ ग्रामपंचायतीकडून नेरळ गावातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना पत्र पाठवून सूचना दिली आहे. यापुढे रस्त्यावर, गटारात, सार्वजनिक ठिकाणी जे कोणी इंजेक्शन आणि अन्य जैव वैद्यकीय कचरा टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. या तरीदेखील असा प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी कार्यवाही केली जाईल, तसेच संबंधितांचे परवाने रद्द करण्याची शिफारस नेरळ ग्रामपंचायत करेल, असा इशार देण्यात आला आहे.
आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना याबाबत सूचना दिल्या आहेत. सर्वांनी त्याबाबत सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. मात्र, आम्ही सूचना केल्यानंतरदेखील असे प्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाईल.
उषा पारधी, सरपंच, नेरळ