कसब्यात भाजपला तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला दणका

मविआचे रवींद्र धंगेकर भाजपच्या अश्‍विनी जगताप विजयी

| पुणे | प्रतिनिधी |

कसबा पेठ पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांच्यावर मात केली आहेे. त्याचबरोबर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्‍विनी जगताप विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे नाना काटे यांचा पराभव केला. या मतदार संघात राष्ट्रवादीच्या राहूल कलाटेंची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर पडली आहे.

पहिल्या फेरीपासून अगदी शेवटच्या 21 व्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर यांनी आघाडी कायम ठेवली. धंगेकर यांना 72,599 तर हेमंत रासने यांना 61771 अशी मते मिळाली. धंगेकरांनी 11 हजार मतांनी विजय संपादित केला. ब्राह्मण समाजाची नाराजी, अँन्टीइन्मबन्सीचा फटका, गिरीश बापटांची अनुपस्थिती या सगळ्यामुळे भाजपला कसब्यात जोरदार फटका बसला.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या अश्‍विनी जगताप याना 52,046 तर राष्ट्रवादीचे नाना काटे यांना 42,933 एवढी मते मिळाली.अपक्ष राहुल कलाटे यांना 16,068 मिळाली.

जनतेने माझ्यावर मतांचा पाऊस पाडला. खरंतर पहिल्या दिवसापासून जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती. कामाचा माणूस निवडून द्यायचा हे जनतेने ठरवलं होतं. जनतेने माझ्यावर आता मोठी जबाबदारी टाकलीये. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी इथून पुढच्या सव्वा वर्षात 18-18 तास काम करेन.

रवींद्र धंगेकर, विजयी उमेदवार

जनतेचा कौल मला मान्य आहे. मी कुठे कमी पडलो, याचं मी आत्मचिंतन करेन. भाजप नेतृत्वाने मला उमेदवारी दिली. माझ्यावर विश्‍वास टाकला, याबद्दल नेतृत्वाचं मी आभार मानतो. धंगेकरांना विजयासाठी शुभेच्छा देतो.

हेमंत रासने (पराभूत उमेदवार)

वापरा आणि फेका हे भाजपाचं धोरण आहे हे मी बोललो होतो. तेच पुण्यात झालं. शिवसेनेचाही वापर करून फेकला. मुक्ता टिळक यांच्या घरातही तिकिट दिलं गेलं नाही त्यामुळे वापरा आणि फेका हेच समोर आलं. गिरीश बापट यांना ऑक्सिजनच्या नळ्या लावून प्रचाराला आणलं. सहानुभूती पाहिजे पण ती पण सिलेक्टिव्ह हवी हे मतदार कधी स्वीकारत नाही.

उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
Exit mobile version