संजय राऊत यांचा हल्लाबोल
। मुंबई । वृत्तसंस्था ।
अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे, तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी. भाजपवाले चोराच्या आळंदीत घेऊन चालले आहेत. अशा शब्दांत गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून भाजपची यथेच्छ शाब्दिक धुलाई करण्यात आली आहे. त्यामुळे इथून पुढचा शिवसेना आणि भाजपविरुद्धचा राजकीय सामना ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर जोरदार रंगणार, यात शंकाच नाही.
सामनाच्या अग्रलेखातून भाजपची अक्षरशः पिसे काढण्यात आली आहेत. अग्रलेखात म्हटले आहे की, मंदिराच्या नावावर मलिदा लाटणे सुरू आहे. अयोध्येच्या महापौरांनी एक जमीन खरेदी केली. त्यात जमिनीचा व्यवहार लाखांत झाला व तीच जमीन त्यांनी पुढच्या पाच-दहा मिनिटांत रामजन्मभूमी ट्रस्टला 16 कोटींना विकल्याचे प्रकरण समोर आले आहे. महापौर श्री उपाध्याय भाजपचे. प्रभू श्रीरामाच्या नावावरचा हा चोरबाजार. यालाच कोणी हिंदुत्व मानत असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत घातलेलेच बरे, असे म्हटले आहे.
इतकेच नाही तर या अग्रलेखातून बाबरी मशिदीबाबतही टोलेबाजी करण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की, आम्ही बाबरी पाडलीच नाही हो, असे सांगून पळ काढणार्यांचे वंशफ मंदिर परिसरातील इस्टेट एजंट बनले व त्या इस्टेट एजंटांकडे ईडी, सीबीआयचे लक्ष जात नाही हे आश्चर्यच म्हणावे लागेल. राममंदिर लढ्यातील कारसेवकांवर गोळ्या झाडणारे जितके गुन्हेगार आहेत त्यापेक्षा मोठे गुन्हेगार रामंदिर लढ्यातील हौतात्म्याचा हा असा व्यापार करणारे आहेत, अशा शब्दांत समाचार घेण्यात आला आहे.