भ्रष्टाचाराचे उत्तर भाजपने द्यावे- ठाकरे

मालेगावच्या सभेत विरोधकांचा समाचार

| मालेगाव | प्रतिनिधी |

देशातील सर्वसामान्य, विरोधकांच्या भ्रष्टाचाराबाबत ईडी, सीबीआय मार्फत चौकशी करणार्‍या भाजपने 20 हजार कोटींच्या भ्रष्टाचाबाबत जनतेला उत्तर द्यावे, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. मालेगाव येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना त्यांनी ठाकरी भाषेत शिंदे गटाचा समाचार घेतला.

मालेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. गद्दारी करुन गेलात, धनुष्यबाण चोरलात, नाव चोरलेत पण माझा एकही निष्ठावान माणूस तुम्ही फोडू शकला नाही. निवडणूक आयोगाने एकदा मालेगावच्या सभेकडे उघड्या डोळ्यांनी पहावे म्हणजे त्यांना नेमके समजेल खरी शिवसेना कुठली, असा टोलाही लगावला. हिम्मत असेल तर आता निवडणुका घ्या, तुम्ही मोदींच्या नावाने मते मागा मी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मते मागतो. बघू राज्यातील जनता कुणाला निवडूण देते, असे खुले आव्हानही ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटाला दिले.

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना पाठिंबा दिला. राहुल यांनी फक्त विचारले की त्या 20 हजार कोटींचा जबाब मोदींनी द्यावा, मग त्याचे उत्तर भाजप का देत नाही, असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला. आमच्या विरोधकांचे भ्रष्टाचार बाहेर काढून ईडी, सीबीआयमार्फत चौकशी करणार्‍या भाजपने याचे उत्तर देशाला देणे आवश्यक आहे, अशी मागणीही शिवसेना पक्षप्रमुखांनी केली.

तुम्ही खंडोजी खोपडेंची औलाद आहात, गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही. आयुष्यभर तुमच्यावरचा गद्दार शिक्का पुसला जाणार नाही. असा घणाघात त्यांनी शिंदेंवर केला. तर, भाजपवरही ठाकरेंनी हल्लाबोल केला. मिंधेंच्या नेतृत्वात तुम्ही निवडणुका लढणार का? तुमची 152 कुळं खाली उतरली तरी ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकत नाही असा घणाघात ठाकरेंनी केला.

सावरकर आमचे दैवत
याच सभेत ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वीर सावरकर यांच्याविषयी टीका न करण्याचे आवाहन केले. आपण सोबत आहोत पण आम्ही सावरकरांविषयी अनुद्गार कदापि सहन करणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

मोदी म्हणजे भारत नव्हे, सर्व भ्रष्टाचारी भाजप पक्षात सहभागी झाले आहेत. भाजप हा भ्रष्टाचार्‍यांचा पक्ष झाला आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्या चौकशीची काय झाले?

उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
Exit mobile version