स्नेहल जगताप यांच्या हाती शिवबंधन
| महाड | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या महाडनगरीत शिवसेनेशी गद्दारी करणारा निपजला आहे. अशा गद्दारीला चिरडून टाकल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि.6) महाड येथे दिला.

महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. यानिमित्ताने चांदे मैदानात आयोजित केलेल्या जाहीर सभेत ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महाडमधील गद्दारीवर बोलताना त्यांनी महाडची भूमी ही शूरवीरांची आणि निष्ठावंतांची भूमी आहे. याच भूमीत भगव्याला कलंक लावणारे गद्दार निर्माण झाले हे दुर्दैव समजले, अशा गद्दारांना येणार्या निवडणुकीत गाडल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी महाड हा शिवसेनेचाच मतदार संघ असून, भविष्यातही भगवाच येथे फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारच्या कारभारावरही जोरदार टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. बारसू येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पावरुन आपली दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. कोकणी माणसावर दडपशाही करुन जर प्रकल्प आणला जात असेल तर त्याला आम्ही कडाडून विरोध केल्याशिवाय राहणार नाही. यासाठी अवघा महाराष्ट्र कोकणात उतरविल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले. दरडग्रस्त तळीळेच्या पुनर्वसनासाठी आपल्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. पण विद्यमान सरकारने एकाही दरडग्रस्तांना घर दिले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
नॅपकीन कमी पडला पाहिजे
ठाकरे यांनी महाडचे आ.भरत गोगावले यांच्यावर टीका केली. खांद्यावर नॅपकीन टाकून फिरणार्या या आमदाराला यावेळी घाम फोडल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, त्याला नॅपकीन कमी पडले पाहिजे, अशी मिश्किल टिपणी त्यांनी केली. मी मुख्यमंत्री म्हणून अयोग्य होतो म्हणून गद्दारी केली. तळीयेमध्ये हा गद्दार आमदार गेला तरी होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.