मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील उमेदवारांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी पार पडली. यात अपेक्षेप्रमाणे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे,तर अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात वसंत खंडेलवाल विजयी ठरले.
बावनकुळेंना 362 मतं मिळाली, तर मंगेश देशमुखांना 186 मतं मिळाली आहेत. मात्र, काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना अवघं एक मत मिळालं आहे, तर 5 मतं अवैध ठरली.
अकोल्यात भाजपाचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांच्या पारड्यात तब्बल 443 मतं पडली होती, तर शिवसेनेचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना 334 मतं पडली होती. या प्रक्रियेमध्ये 31 मतं बाद ठरली.
विधान परिषदेच्या 6 पैकी 4 जागेवर भाजपला विजय मिळाला असून, राज्यातील जनता भाजपसोबत आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा विजय भविष्यातील विजयाची नांदी आहे. या विजयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांचंही आभार मानतो. तसेच आपण स्वत: निवडून आल्यावर जेवढा आनंद झाला नव्हता तेव्हा आता झालेला आहे.
देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते