रुग्णालयाचा साठा असताना ही बाहेरील औषधांची चिठ्ठी; नातेवाईकांच्या तक्रारीनंतर कृषीवलने केला पर्दाफाश
। अलिबाग। प्रमोद जाधव ।
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध असलेल्या औषधांऐवजी खासगी मेडिकलमध्ये मिळणारी औषधे सरकारी कागदावर लिहून दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये औषधे उपलब्ध असताना बाहेरील औषधे दिली जात असल्याचा पुरावा कृषीवलच्या हाती लागताच सत्यता पडताळण्यात आली. त्यावेळी ही बाब समोर आली असून डॉक्टरांच्या कामगिरीवर संशय व्यक्त केला जात आहे. औषधीसाठा असतानाही डॉक्टरांकडून बाहेरील औषधांची चिठ्ठी दिली जात असल्याने त्यांचे मेडिकलवाल्यांसोबत लागेबांधे असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहरी व ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी अलिबागमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय गेल्या 38 वर्षापूर्वी उभारण्यात आले. दोनशे खाटांचे असलेल्या रुग्णालयातील बाह्य रुग्ण कक्षामध्ये दिवसाला शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. वेगवेगळ्या आजारावरील रुग्णांवर या कक्षामार्फत उपचार केले जातात. कृषीवलच्या टीमने गुरुवारी सकाळी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान काही रुग्णांशी संवाद साधला. त्यांच्याकडील असलेल्या केसपेपरची विचारणा केली. परंतु केस पेपरवर लिहून दिलेल्या औषधांपैकी एकही औषध रुग्णालयात मिळत नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. याबाबत खात्री करण्यात आली. त्यावेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला.
कानापासून ताप व रक्तदाब अशा वेगवेगळ्या आजाराची लिहून दिलेली औषधे खासगी मेडीकलमधील असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयात उपलब्ध असलेल्या औषधांऐवजी खासगी मेडिकलमध्ये मिळणारी औषधे सरकारी कागदावर लिहून दिल्याने तेथील डॉक्टर औषधांचा काळाबाजार करीत असल्याचा आरोप अनेकांनी व्यक्त केला.
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात औषध भंडार केंद्र असून त्यामार्फत रुग्णालयातील औषध वितरण विभागाला औषधांचा पुरवठा केला जातो. सध्या औषध भंडारमध्ये खोकला, घसा, अॅसिडीटी, रक्तदाब, शुगर, कान आदी आजारांवरील औषधांचा साठा दोन महिने पुरेल इतका असल्याचे सांगण्यात आले. शासनाने मंजूर केलेली वेगवेगळ्या आजाराची औषधे असताना खासगी मेडीकलमधील औषधे डॉक्टरांनी का लिहून दिली, असा प्रश्न रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये निर्माण झाला आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांची किंमत खासगी मेडीकलमध्ये तीनशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यत आहे. त्यामुळे औषधे लिहून देणार्या डॉक्टरांच्या कारभाराबाबत संशय निर्माण झाला आहे.
खोकला व इतर आजारावरील औषधांचा साठा दोन ते तीन महिने पुरेल इतका उपलब्ध आहे. दर महिन्याला औषधांची मागणी केली जाते. शासनाने मंजूर केलेल्या औषधांचा मुबलक साठा उपलब्ध आहे.
धोंडीबा कदम,
औषध निर्माण अधिकारी
जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी प्रयत्न कायमच राहिला आहे. बाह्यरुग्ण कक्षात उपचारासाठी येणार्या रुग्णांना रुग्णालयातील असलेली औषधेच लिहून दिली जातात. उपचारासाठी असलेल्या डॉक्टरांकडे त्याची यादी दिली जाते. परंतु केसपेपरमध्ये बाहेरील मेडिकलमधील औषधे लिहून दिली असल्यास त्याची पडताळणी करून पुढील कारवाई केली जाईल. याबाबत डॉक्टर व औषध पुरवठा करणार्यांची बैठक घेऊन समन्वय साधून औषध पुरवठा करण्याची सूचना केली आहे.
डॉ. निशीकांत पाटील
प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक
उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आलो. डॉक्टरांनी तपासून केसपेपरवर औषधे लिहून दिली. परंतु यातील एकही औषध रुग्णालयात नसल्याची माहिती मिळाली. खासगी मेडिकलमध्ये या कंपनीची औषधे असल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारी दवाखान्यात उपलब्ध असलेल्या औषधांऐवजी बाहेर मिळणारी औषधे का लिहून दिली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मनश्री पाटील,
रुग्ण
