| रोहा | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटाव मधील साधाना नायट्रोकेम लि. या केमिकल कंपनीतील ओडीबी2 केमीकल प्लाँटमध्ये भीषण स्फोट झाला. सदरची घटना गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास घडली. त्यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये नेले असल्याची माहिती रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
स्फोट इतका भीषण होता की, याचा आवाज परिसरात एक किलोमीटर लांबपर्यंत ऐकू गेला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा दाखल झाली. त्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच काळ प्रयत्न करावा लागला. केमिकल कंपनीतील ओडीबी2 केमीकल प्लाँट आहे. ओडीबी2 प्रॉडक्ट वॉशिंग करण्यासाठी असलेल्या मेथानोल केमिकलच्या स्टोरेज टँकवर एमके फॅब्रिकेटर्सचे सहा कामगार वेल्डिंग काम करीत होते. त्यावेळी स्फोट होऊन सहा कामगार जखमी झाले. या अपघातात दोन कामगार ठार झाले, तर अन्य चार जण जखमी झाले.
या एमआयडीसीमध्ये यापूर्वीही अनेकवेळा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आग आणि स्फोटाच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अनेक निष्पाप कामगारांचे प्राण गेले आहेत, तर काहींना अपंगत्व आले आहे. असे असूनही इथे कामगारांच्या सुरक्षतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. सतत घडणार्या अशा घटनांमुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान ज्या कंपनीमध्ये स्फोट झाला आहे ती, केमिकलची असून साधना नायट्रो केमिकल असे कंपनीचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामुळे मुंबई आणि परिसरातील एमआयडीसीमध्ये विविध कंपन्यांमध्ये झालेल्या स्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. गेल्या वर्षी एका औषध कंपनीत झालेल्या स्फोटात 7 जण ठार झाले होते. मे 2023 मध्ये डोंबिवली एमआयडीसीमध्ये अमूदान केमिकल कंपनीत बॉयलरचे लागोपाठ चार-पाच स्फोट झाले होते. यात संपूर्ण कंपनी बेचिराख झाली होती.