| रायगड | खास प्रतिनिधी |
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट यंत्राचे मतदारांना प्रशिक्षण, प्रसार, प्रसिद्धी व जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी प्रात्यक्षिक केंद्र आणि मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन तयार करण्यात आली आहे. या मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅन 15 तालुक्यांतील सात विधानसभा क्षेत्रात फिरणार आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनला मंगळवारी हिरवा झेंडा दाखवून या जनजागृती कार्यक्रमास प्रारंभ केला.
10 ऑक्टोबरपर्यंत ही मोबाईल व्हॅन 15 तालुक्यांतील गावे, वाड्या, वस्ती येथे भेट देऊन ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती करणार आहे. या मोबाईल व्हॅनद्वारे प्रात्यक्षिक करता येणार आहे. तसेच प्रात्यक्षिक केंद्र प्रत्येक विधानसभा मतदार संघस्तरावर मतदारांना प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या क्षेत्रात, गाव व शहरातील मुख्य चौक, बाजार, शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींची कार्यालये, सभांच्या ठिकाणी इत्यादी मोक्याच्या ठिकाणी मोबाइल व्हॅनद्वारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. तसेच मतदारांना अभिरुप मतदान करण्यासाठी ईव्हीएम जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.