महाड, पाली परिसरात मोरया भाविकांची मांदियाळी
महामारीच्या उच्चाटनासाठी विघ्नहर्त्याचरणी साकडे
। सुधागड/महाड । वार्ताहर ।
जागतिक स्तरावर नववर्षाचे स्वागत करण्यात आले असून, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोरया भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. यामुळे महाड आणि पाली परिसरात मोरया भाविकांच्या मांदियाळीने ही क्षेत्र गजबजून गेली.
कोरोना या वैश्विक महामारीचे समूळ उच्चाटन व्हावे आणि जग पुन्हा एकदा आरोग्यमयी व्हावे, असे साकडे भाविकांनी विघ्नहर्त्याचरणी केले आहे. अष्टविनायकांची दोन क्षेत्र रायगड जिल्ह्यात असून, जिल्ह्यातील भाविकांसह नवी मुंबई, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, पालघर आदी ठिकांणाहून मोरया भाविकांनी या महाड आणि पालीमध्ये हजेरी लावली. यामुळे परिसरांना जत्रेचे स्वरूप आले असून, स्थानिक व्यावसायिकांच्या अर्थचक्राला गतीशील होण्यास हातभार लागला. दरम्यान, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यासाठी सर्वस्तरीय प्रशासनानेही दक्षपणे आपल्या कर्तव्यांचे पालन केले.
देवस्थान प्रशासनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोनाकाळात विशेष खबरदारी घेत उपाययोजना केल्या आहेत. ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणार्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही किंवा आरोग्यविषयक निर्बंधांची पायमल्ली होणार नाही, यासाठी मंदिरप्रशासन सतर्क आहे.
अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष,
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली
