‘सेम स्पेलिंग’मुळे पर्यटकांना बसतो भुर्दंड; गुगल मॅपचा आधार ठरतोय अडचणीचा
। महाड । उदय सावंत ।
अष्टविनायकांमधील एक असलेले महड या या गणेश मंदिरामध्ये जाण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक भाविक येत असतात. मात्र या भाविकांना तसेच पर्यटकांना एका स्पेलिंगमुळे जवळपास शेकडो किलोमीटरचा प्रवास करण्याचा भुर्दंड बसत आहे. महड आणि महाड यामधील इंग्रजी स्पेलिंग समान येत असल्याने अनेक जण महडला जाण्याऐवजी महाडला येतात.
इंग्रजीमध्ये किंवा युनिकोडमध्ये टायपिंग करताना महड आणि महाड यांची इंग्रजी स्पेलिंग जवळपास समान आहे. महड (चअकअऊ) आणी ऐतिहासिक महाड(चअकअऊ) स्पेलिंग देखील एकच आहे. अष्टविनायकांपैकी महड येथील गणेश मंदिर एक आहे. जवळच पालीचा बल्लाळेश्वर देखील आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरून देखील अष्टविनायक यात्रा करण्यास अनेक भाविक येत असतात. रायगड जिल्ह्यामध्ये पाली चा बल्लाळेश्वर आणि महडचा वरदविनायक हा अष्टविनायकातील चौथा गणपती मानला जातो. पाली पासून महाड हे अंतर जवळच आहे. मात्र पाली पाहून झाल्यानंतर अनेक जण मोबाईलवरील गुगल मॅप किंवा गुगल वरील माहितीचा आधार घेऊन प्रवासाला सुरुवात करतात. पालीपासून महाड हे अंतर जवळपास 70 किमी होऊन अधिक आहे. या प्रवासाला साधारण दीड तास लागतो. यामुळे पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर भाविक वरदविनायकाच्या दर्शनाला जाताना गुगल मॅपचा आधार घेतल्यामुळे थेट महाडला येऊन थांबतात.
महाड शहरामध्ये प्रवेश केल्यानंतर गणेश मंदिर कुठे आहे असा प्रश्न दररोज ऐकावयास मिळतो. महाड शहरात देखील छोटी छोटी गणेश मंदिरे आहेत. मात्र बाहेरून आलेला पर्यटक ज्यावेळेस गणेश मंदिर कुठे आहे असा प्रश्न करतो त्यावेळेस जागरूक महाडकर त्याला तुम्ही चुकून महाडला आला आहात याची जाणीव करून देतो. ज्यांना अष्टविनायक करायचे आहे तो महाड वरून पुन्हा महडकडे जातो. मात्र जे केवळ पर्यटनासाठी आलेले आहेत ते परत न फिरता महाड आणि परिसरातील रायगड किल्ला, गांधार पाले लेणी पाहून पुढे तळ कोकणाकडे जातात. अनेक वेबसाईटवरदेखील महड याचा उल्लेख महाड असाच आहे. शिवाय गुगल मॅपवरदेखील इंग्रजीमध्ये स्पेलिंग चअकअऊ अशी टाकली जात असल्याने नकाशा प्रमाणे वाहन चालक थेट महाडला येऊन थांबत आहेत. यामुळे अनेक पर्यटक भाविकांचा वेळ, इंधन वाया जाऊन मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
पालीमध्ये बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी त्या ठिकाणी महडला जाणारा मार्ग आणि किलोमीटर याबाबत योग्य माहिती घेतली पाहिजे. किंवा प्रशासनाने त्या ठिकाणी योग्य फलकाची सुविधा करणे आवश्यक आहे. गेली काही दिवसांमध्ये महाडमध्ये महडला जाणारे अनेक पर्यटक चुकून आल्याचे निदर्शनास झाले आहे.