। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरात रस्त्यावर बिनधास्तपणे मोकाट फिरणारा जर्मन शेफर्ड कुत्रा त्याच्या मालकाच्या हाती अखेर लागला आहे. बहुतेक वेळा श्रीमंतांच्या बंगल्याच्या आवारात असणारा हा जर्मन शेफर्ड रस्त्यावर दिसल्याने अनेकांनी त्याला कौतुकाने पाहिले तर शालेय मुले घाबरून पळू लागली असे चित्र कर्जत शहरात सकाळच्या वेळी होते.
कर्जत शहरातील मुद्रे येथे राहणारे कुत्र्याचे मालक हे आपल्या बंगल्यात बांधून ठेवलेले असलेल्या जर्मन शेफर्ड या कुत्र्याला आज सकाळी फिरायला घेऊन गेले.त्यावेळी हा जर्मन शेफर्ड आपल्या मालकाच्या हातातुन निसटुन पळाला. कुत्रा मालकाने त्या जर्मन शेफर्डचे मागे धाव घेऊन त्याला पकडायचा प्रयत्न केला. आपला कुटुंबातील सर्वांचा लाडका जर्मन शेफर्ड हातातुन निसटुन गायब झाल्यामुळे मालक हवालदिल झाले. जीवापाड जपलेल्या कुत्र्याला शोधण्यासाठी त्या कुत्र्यांच्या मालकाने कर्जत शहर पालथे घातले. शनी मंदिर परिसर, नदीचे किनारे आदी ठिकाणी शोध घेतला. जर्मन शेफर्ड कुत्र्याचा शोध घेत असतानाच कर्जत शहरातील रस्त्यांवर फारसे न दिसणारे जर्मन शेफर्ड दिसल्याने काहींनी त्याचे व्हिडीओ काढले.
शालेय मुलांनी घेतली मजा.. काहींची तारांबळ..
सकाळच्या वेळी कर्जत शहरात जर्मन शेफर्ड जातीचा पाळीव कुत्रा मोकाट फिरत आहे. रस्त्यावरुन जाणार्या शालेय विद्यार्थ्यांच्या, नागरिकांच्या मागे मागे धावत आहे. शालेय मुलं घाबरुन पळत आहेत आणि कुत्रा त्यांच्या मागे मागे धावत आहे, असे चित्र दिसले.शालेय विद्यार्थी घाबरून बाजूला जात होते,तर काही विद्यार्थी त्याचा आनंद घेत होते.मात्र रस्त्याने फारसा कधी न दिसणारा जर्मन शेफर्ड दिसल्याने त्याची मजा घेतली तसेच हा जर्मन शेफर्ड नंतर त्याच्या मालकाला मिळाला त्यावेळी त्यांना देखील हायसे वाटले.