रायगड जिल्ह्यात मतदार नोंदणीसाठी बीएलओ फिरणार घरोघरी


14 लाख 86 हजार मतदारांचे झाले सर्वेक्षण

| रायगड | प्रतिनिधी |

संक्षिप्त मतदार यादी मोहिमेंतर्गत घरोघरी मतदार नोंदणी मोहिमेत जिल्ह्यात आतापर्यंत 65 टक्के गृहभेटी दृष्टीपथास आल्या आहेत. या मोहिमेला कमी प्रतिसाद मिळाल्याने तिची मुदत वाढविली गेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्या अंतर्गत महिनाभरापासून निवडणूक विशेष संक्षिप्त मोहिमेंतर्गत नवमतदार नोंदणी तसेच मतदार यादी दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची नोंद करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा क्षेत्रातील 14 लाख 86 हजार 183 मतदारांपर्यंत पोहचले आहेत.

जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघात 22 लाख 98 हजार 210 हजार मतदार आहेत. बीएलओंनी सुरु केलेल्या घरोघरी मोहिमेत आतापर्यंत 14 लाख 86 हजार 183 मतदारांचा सर्वे झाला आहे. या सर्व्हेमध्ये 17 हजार 90 मतदार घरी नसल्याचे आढळून आले. 12 हजार 448 मतदारांनी स्थलांतर केले आहे. 22 हजार 694 मतदारांचा मृत्यू झाल्याचे सर्वेक्षणात निष्पन्न झाले. सात हजार 284 मतदारांचे ओळखपत्र पुसट झाल्याचे पाहावयास मिळाले. एक हजार 547 मतदारांची नावे मतदार यादीत दुबार असल्याचे आढळून आले. अद्यापही आठ लाख 12 हजार 27 मतदारांचा सर्वे करण्यासाठी बीएलओंना घरोघरी जावे लागणार आहे.

अद्याप सर्वे बाकी
रायगड जिल्ह्यातील मतदारांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी दोन हजार 733 बीएलओंची नेमणूक करण्यात आली होती. अद्यापही आठ लाख 12 हजार 27 मतदारांचा सर्वे करण्यासाठी बीएलओंना घरोघरी जावे लागणार आहे. पनवेल विधानसभा क्षेत्रात दोन लाख 27 हजार 995, कर्जत 83 हजार 1, उरण एक लाख 71 हजार 649, पेण एक लाख 27 हजार 386, अलिबाग 73 हजार 16, श्रीवर्धन 44 हजार 82 आणि महाड विधानसभा मतदारसंघातील 84 हजार 858 मतदारांचा सर्वे शिल्लक राहिला आहे.

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा घरोघरी जाऊन सर्वे करण्याचा कार्यक्रम युद्धपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत 65 टक्के काम पूर्ण झाले असून, 35 टक्के मतदारांचा सर्वे करण्याचे काम शिल्लक आहे. सर्वे तातडीने करण्याच्या सूचना बीएलओंना देण्यात आल्या आहेत. लवकरच जिल्ह्यातील मतदार संघात असणाऱ्या मतदारांचा सर्वे पूर्ण होईल.

स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी निवडणूक
Exit mobile version