मासेमारी करून अनोखे आंदोलन; अतिक्रमणे हटवण्याची मागणी
| हमरापूर | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील कळवे-दादर रस्त्यावर ॲक्सिस बँकेसमोर पावसाचे पाणी साचून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत असल्याच्या निषेधार्थ कळवेसह परिसरातील ग्रामस्थांनी बुधवारी (दि. 1) पाण्यात बसून रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे, साचलेल्या पाण्यात मासेमारी करून ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले.
कळवे-दादर रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात झालेल्या बांधकामांमुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा बंद झाला आहे. परिणामी पावसाळ्यात या ठिकाणी दोन ते तीन फूट पाणी साचते. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होत असून शालेय विद्यार्थी, नोकरदार तसेच नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरेदीसाठी पेण शहरात जाणेही अनेकदा अशक्य होते.
या समस्येबाबत कळवे ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार लेखी निवेदने देऊन रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी केली होती. मात्र वर्षभर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
आंदोलनाची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे, तहसीलदार तानाजी शेजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नारकुल, पोलीस निरीक्षक संजयकुमार ब्राह्मणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एम. डी. पाटील घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत जेसीबीच्या साहाय्याने बंद झालेले नैसर्गिक पाण्याचे मार्ग तातडीने खुले करण्यास सुरुवात केली. यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी, नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्यांवर तसेच कामात हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. त्यानंतर सुमारे पाच तासांनंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले. मात्र भविष्यात पुन्हा पाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनात कळवेचे सरपंच सतीश पाटील, उपसरपंच राजश्री पाटील, माजी सरपंच निवास पाटील, सदस्य प्रमोद पाटील, सोनखार ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप म्हात्रे, जोहेचे उपसरपंच गणेश घरत, सदस्य काशिनाथ पाटील यांच्यासह कळवे, दादर, सोनखार आणि उर्नोली येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ व युवक सहभागी झाले.
गेले वर्षभर आम्ही सार्वजनिक बांधकाम खाते व तालुका प्रशासनाकडे ॲक्सिस बँक रस्त्यावर करण्यात आलेल्या बांधकामाबाबत तक्रारी परंतु त्याकडे लक्षण दिल्याने आम्ही हे रास्ता रोको आंदोलन करत आहोत. या महत्त्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी करून पाण्याचे नैसर्गिक निचरा होण्याचे बंद करण्यात आलेले मार्ग पुन्हा खुले करावे प्रशासनाने यात कडक भूमिका बजावावी.
सतीश पाटील
सरपंच कळवे ग्रामपंचायत







