| सुकेळी | वार्ताहर |
महामार्गावर तसेच वाकण – पाली मार्गावरील दरम्यान मोकाट गुरांचे मोठ्या प्रमाणात रास्तारोको केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचे प्रमाण वाढले असुन याकडे संबंधित व्यक्तींकडुन लक्ष देणे गरजेचे आहे.
या मार्गालगतच्या शेतकर्यांनी आपल्या शेतजमिनी ह्या मोठमोठ्या व्यावसायिकांना विकल्या आहेत. त्यामुळे आपल्याकडील शेती विकणार्या शेतक-यांनी आपली गुरे ही मोकाट सोडली आहेत. जणु त्यांना कोणीही वालीच नाही. अशी या जनावरांची अवस्था झालेली आहे. जमिनी विकत घेतलेल्या मालकांनी सर्व जागेभोवती तारेचे कुंपण घातले आहे. त्यामुळे शेतकर्यांना गुरे चरण्यासाठी जागा राहिली नसल्यामुळे ही गुरे मोकाट सोडली आहेत. अगदी दिवसा तसेच रात्रीच्या वेळेस रस्त्याच्या मधोमध रवंथ करत बसलेली असतात.
या मोकाट गुरांमुळे वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असुन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. तर वाहनचालकांच्या घाई गडबडीत मोठा अपघाताचा धोका देखिल निर्माण होऊ शकतो. त्यातच दुर्दैवाने एखाद्या गुरांचा अपघात झाला तर ही वार्ता कळताच शेतकरी मालक धावतपळत भरपाईसाठी येतो. परंतु एखाद्या गुरामुळे वाहन चालक व प्रवाशांचा अपघात झाला तर कोणीही जवळ येत नाही. त्यामुळे अशा मोकाट गुरांचा बंदोबस्त संबधितांकडुन करण्यात यावा अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांतून होत आहे.