। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लायन्स क्लब ऑफ मांडवाचे संस्थापकीय सदस्य, तसेच लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबागचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मांडवा व वंदे मातरम् ग्रुप, चोरोंडे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 23) चोरोंडे येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 44 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराच्या प्रारंभी लायन्स हेल्थ फाऊंडेशन, अलिबागचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी यांचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रिजन चेअरमन अरविंद घरत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभीष्टचिंतन करण्यात आले. याप्रसंगी तसेच रक्तदान शिबिरासाठी विद्या नितीन अधिकारी, साहित्यिक उमाजी केळुसकर, लायन्स क्लब मांडवाचे अध्यक्ष मोहन पाटील, सचिव हर्षद पाटील, डीसी डायबेटीस स्कनिंग अमिष शिरगावकर, डीसी कम्युनिटी सर्व्हिस धवल राऊत, सुबोध राऊत, चंद्रकांत मल्हार, पंकज केसरकर, सुमित पाटील, विलास पाटील, अभिजित गुरव, डॉ. राजाराम हुलवान, जितेंद्र ठाकूर, हेमलता घरत, सारिका पाटील आदी लायन्स क्लब पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात 44 जणांनी रक्तदान केले. जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी आणि त्यांच्या पथकाने, तसेच वंदे मातरम् ग्रुप, चोरोंडेचे सदस्यांनी हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.