पाणीप्रश्न न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा
। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने खारेपाटातील महिलांनी आक्रमक भूमिका घेत येत्या पंधरा दिवसांत पाणीप्रश्न सोडविला नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
2 मार्च रोजी येथील महिलांनी पाणीप्रश्नी एकत्रित येत तो तात्काळ सोडवावा, यासाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. या आंदोलनानंतर प्रशासनाने टँकरने पाणी सुरू केले तेव्हा प्रशासनाचे आभार मानत महिलांनी पुढील मागण्यांचे निवेदन दीडशे महिलांच्या सहीने पेण प्रांत कार्यालयात दिले.
यावेळी रखडलेले पाणी योजना प्रकल्प हेटवणे ते शहापाडा वाढीव पाणी योजना, डावातीर कालवा, बाळगंगा धरणाचे पाणी मिळावे, दक्षिण शहापाडा योजना तसेच धरण व इतर जलसाठातील गाळ काढणे, इत्यादी कामे प्रशासनाने आश्वासित वेळेत पूर्ण व्हावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी गोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. अनेक ठिकाणी अत्यंत अशुद्ध पाणी पुरवठा तोही दोन ते तीन दिवसाआड आणि एक ते दोन तासच पाणी येते. होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने आणि अत्यंत अशुद्ध आहे, जो पिण्यास योग्य नाही. तेव्हा बोरवे, काळेश्री, दीव, वढाव इत्यादी अनेक ठिकाणी काही जलशुद्धीकरण प्रकल्प त्वरित उभे करावेत. लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी टँकर संख्या वाढवावी. गावोगावी असलेली तलाव व जल्साठ्यातील गाळ काढणे, शुद्धीकरण, सुशोभिकरण इत्यादी कामे सन्माननीय व योग्य मोबदला देत ग्रामस्थ महिला नागरिकांकडे करण्यास द्यावी. पाण्याचे कंपनीकरण थांबवून महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामपंचायत आदी शासन प्रशासन विभागाकडे काम द्यावे. प्रशासनाने दिलेल्या 31 मार्च ते 15 एप्रिल या आश्वासित वेळेत काम व्हावे, अपेक्षा व्यक्त केली आहे.
शासन-प्रशासनाने अत्यंत संवेदनशीलपणे हा प्रश्न त्वरित सोडवावा अन्यथा येत्या पंधरा दिवसात पाणी प्रश्नासंदर्भात उपोषण आंदोलन करावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच स्थानिक प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मयुरी रंजीता सुनीता ठाकूर, दीप्ती ज्योती गावंड, विशाखा सुनंदा, दिपाली पाटील, करुणा अनुष्का म्हात्रे आदी भगिनी उपस्थित होत्या.