। उरण । वार्ताहर ।
उरण ओएनजीसी आपू गेटसमोरील म्हातवली ग्रामपंचायतीच्या डंपिंग ग्राऊंडवरील कचर्याने अचानक पेट घेतला. आगीचा प्रचंड भडका उडाला. परंतु, ओएनजीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग लागलीच आटोक्यात आणल्याने पुढील होणारा अनर्थ टळला. या घटनेतून बोध घेऊन ग्रामपंचायत आणि ओएनजीसी कंपनीने एकत्र बसून याबाबत गांभीर्याने विचार करावा, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
उरणमधील पिरवाडी समुद्रकिनार्यावर जाणार्या रस्त्याच्या दक्षिणेकडील बाजूला ऑईल अँड नँचरल गॅस कंपनी बसलेली आहे. तिचा पसारा अगदी उरण शहरापासून ते पिरवाडी समुद्रकिनार्यापर्यंत पसरलेला आहे. या कंपनीच्या उत्तरेकडे अगदी रस्त्याला लागून म्हातवली ग्रामपंचायतीचा डंपिंग ग्राऊंड आहे. त्या ग्राऊंडवर टाकलेल्या कचर्याला रात्रीच्या सुमारास आग लागली. हा परिसर संवेदनशील आसल्याने आगीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. परंतु ओएनजीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग लागलीच आटोक्यात आणल्याने पुढील होणारा अनर्थ टळला.