250 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू
। ढाका । वृत्तसंस्था ।
अंदमान समुद्रात मलेशियाकडे निघालेल्या एका बोटीचा अपघात होऊन अवैधरित्या प्रवास करणाऱ्या सुमारे 250 ते 280 प्रवाशांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये प्रामुख्याने रोहिंग्या मजूर आणि बांगलादेशी नागरिकांचा समावेश होता. या दुर्घटनेत आतापर्यंत केवळ 9 जणांना वाचवण्यात यश आले असून 250 हून अधिक प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत.
ही घटना 9 एप्रिल रोजी घडली. अनेक दिवस समुद्रात प्रवास केल्यानंतर खराब हवामान आणि प्रचंड लाटांमुळे बोट उलटल्याची माहिती समोर आली आहे. समुद्रात गस्त घालत असलेल्या जहाजांना काही प्रवासी जिवंत अवस्थेत आढळून आल्यानंतर या दुर्घटनेचा उलगडा झाला.
बांगलादेश कोस्ट गार्डचे मीडिया अधिकारी लेफ्टनंट कमांडर सब्बीर आलम सुजान यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमटी मेघना प्राइड या जहाजाने चिटगावहून इंडोनेशियाकडे जात असताना 9 प्रवाशांना वाचवले. त्यानंतर त्यांना ‘मन्सूर अली’ या गस्ती जहाजाकडे सोपवण्यात आले.
या दुर्घटनेत बचावलेल्या रफीकुलच्या माहितीनुसार, नंतर सर्वांना एका मोठ्या मासेमारी बोटीत बसवण्यात आले. या बोटीत एकूण सुमारे 280 जण होते. त्यात 150 रोहिंग्या, उर्वरित बांगलादेशी नागरिक, 21 महिला, 4 लहान मुले तसेच 13 तस्कर आणि कर्मचारी यांचा समावेश होता. 4 एप्रिलच्या रात्री सर्वांना छोट्या मासेमारी नौकांमधून समुद्रात नेण्यात आले. बॉर्डर गार्डपासून बचाव करण्यासाठी काही वेळ त्यांना झाडीत लपून बसण्यासही भाग पाडण्यात आले.
