| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात रविवारी (दि.7) एक तरूण गायब झाला होता. सुरज सिंग (31) असे या तरूणाचे नाव आहे. आठ दिवस उलटले तरी या तरुणाचा शोध लागला नव्हता. अखेर या तरुणाचा मृतदेह माथेरान डोंगरातील पाली भूतिवली धरण ते गार्बेट या मार्गावरील जंगलात आढळून आल. या तरूणाचा मृतदेह स्थानिक आदिवासी गुराखी यांना दिसून आल्यानंतर त्यांनी नेरळ पोलीस ठाणे यांना कळवले.
मिळालेल्या माहितीनुसार, 7 सप्टेंबर रोजी सुरज सिंग हा तरुण लोणावळा येथील डोम धरण आणि नंतर कर्जत तालुक्यातील पाली भूतिवली धरण परिसरात पुढे गार्बेट येथे जात असल्याचे त्याच्या मोबाईल लोकेशन वरून स्पष्ट झाले. या तरुण ट्रेकर्सचे शेवटचे लोकेशन पाली भूतिवली धरणाच्या बाजूला माथेरान डोंगराच्या पायथ्याशी आढळून आले होते. त्यांनतर सकाळी सव्वाआठ वाजताच्या नंतर त्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यांनतर सुरज सिंगच्या नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतल्यावर त्याच्या मोबाईलमधील शेवटच्या लोकेशनवरून जिल्हा पोलीस यंत्रणेकडून तपास सुरू करण्यात आला. मात्र, आठ दिवसात या तरुणाचा मोबाईल सुरू झाला नाही आणि त्यामुळे मोबाईल लोकेशन मिळाले नाही. कर्जत आणि नेरळ पोलिसांच्याकडून सुरज सिंगच्या तपासासाठी अनेक आदिवासी वाड्यांमध्ये पाहणी करण्यात आली. हेल्प फाउंडेशन तसेच सह्याद्री रेस्क्यू टीम अशा अनेक स्वयंसेवी संस्था सुरज सिंग याच्या शोध मोहिमेत होते. अखेर सोमवारी (दि.15) या तरूणाचा मृतदेह स्थानिक आदिवासी गुराखी यांना दिसून आला. त्यानंतर त्यांनी नेरळ पोलीस ठाणे यांना त्याबाबत कळवले.







