। मुंबई । प्रतिनिधी ।
कफ परेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेव्ही नगर येथे एका नौसैनिकासह त्याची पत्नी व दोन चिमुकल्यांचा राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्या नौसैनिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर पत्नी आणि मुलांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला आहे. शनिवारी रात्री उशिराने ही घटना समोर आली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, शवविच्छेदन आणि इतर वैद्यकीय तपासण्यांनंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलाचे अधिकृत निवेदनदरम्यान, या घटनेबाबत भारतीय नौदलानेही अधिकृत निवेदन जारी केले आहे. नौदलाच्या निवेदनानुसार, 15 ऑगस्ट 2026 रोजी कुलाबा येथील नेव्ही नगरमध्ये भारतीय नौदलातील एका नौसैनिकासह त्यांची पत्नी आणि दोन मुले त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळली. या घटनेचा तपास पोलीस आणि भारतीय नौदलाकडून केला जात असून, तपासात आवश्यक ती सर्वतोपरी मदत नौदलाकडून केली जात आहे, असे नौदलाने स्पष्ट केले आहे. सध्या घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले असून घटनेपूर्वी घरात काय घडले होते, याचा तपास अधिकारी करत आहेत.
नौदलाच्या खलाशासह पत्नी, दोन मुलांचे मृतदेह आढळले
