डीएनए टेस्ट अनिवार्य; ‘साथी’ पोर्टलमुळे संपूर्ण ट्रॅकिंग
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळावे आणि बोगस बियाण्यांवर आळा बसावा यासाठी खरीप हंगाम 2026 पासून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बोगस बियाणे ओळखण्यासाठी प्रथमच बियाण्यांची डीएनए फिंगरप्रिंट चाचणी करण्यात येणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. यासोबतच बियाण्यांची नोंद आणि व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘साथी’ पोर्टलचा वापर सर्व बियाणे उत्पादक, पुरवठादार आणि विक्रेत्यांसाठी बंधनकारक करण्यात आला आहे.
पुणे येथील शासकीय कृषी महाविद्यालयात आयोजित बियाणे उत्पादक संस्था व विक्रेते यांच्या खरीप हंगामपूर्व राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, बियाणे कायदा आणि बियाणे नियंत्रण आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच निकृष्ट किंवा बनावट बियाणे विकणाऱ्यांवर शेतकऱ्यांच्या हितासाठी कठोर कारवाई करण्यात येईल.
भरणे यांनी सांगितले की, बियाण्यांची उपलब्धता पुरेशी असली तरी ती योग्य वेळी आणि योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘साथी’ प्रणालीमुळे बियाण्यांचे उत्पादन, प्रक्रिया, साठवण, वाहतूक आणि विक्री या संपूर्ण साखळीचे डिजिटल ट्रॅकिंग शक्य होणार आहे. लॉटनिहाय नोंद, एकत्रीकरण, फार्मर आयडी आधारित माहिती आणि “SATHI-Sale Easy” मोबाईल ॲप यांसारख्या सुविधांमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.
खरीप हंगाम 2026 साठी राज्यात सुमारे 145.20 लाख हेक्टर पेरणी क्षेत्र अपेक्षित असून, त्यानुसार 20.16 लाख क्विंटल बियाण्यांची गरज निश्चित करण्यात आली आहे. सध्या राज्यात सुमारे 28.14 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असून, गरजेपेक्षा सुमारे 140 टक्के साठा उपलब्ध असल्याने बियाण्यांच्या बाबतीत राज्य मजबूत स्थितीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यंदाच्या संभाव्य एल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कमी कालावधीत वाढणारे आणि पाण्याचा ताण सहन करणारे वाण उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या. तसेच पेरणी उशिरा झाल्यास पर्यायी पीक नियोजन तयार ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले. कार्यशाळेत बियाणे उत्पादक, विक्रेते आणि कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढवणे, अंमलबजावणीतील अडचणी दूर करणे आणि गावपातळीवर वेळेत बियाण्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला.
“योग्य बियाणे, योग्य वेळी शेतकऱ्यांपर्यंत” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. तसेच हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक सक्षम करण्यासाठी आणि बियाणे पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाचे मुद्दे
खरीप 2026 पासून बोगस बियाणे ओळखण्यासाठी डीएनए फिंगरप्रिंट चाचणी
‘साथी' पोर्टलचा वापर बियाणे उत्पादक व विक्रेत्यांसाठी बंधनकारक
बियाण्यांचे उत्पादन ते विक्रीपर्यंत संपूर्ण डिजिटल ट्रॅकिंग
निकृष्ट व बनावट बियाण्यांवर कठोर कारवाईचा इशारा
राज्यात 20.16 लाख क्विंटल गरज; 28.14 लाख क्विंटल साठा उपलब्ध
145.20 लाख हेक्टर पेरणी क्षेत्र अपेक्षित
एल निनो पार्श्वभूमीवर कमी कालावधी व दुष्काळसह्य वाणांवर भर
“योग्य बियाणे, योग्य वेळी शेतकऱ्यांपर्यंत” यावर सरकारचा फोकस
दत्तात्रय भरणे,
शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. बोगस बियाण्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी डीएनए चाचणीसारखे कठोर उपाय योजले आहेत. ‘साथी’ पोर्टलमुळे बियाण्यांच्या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता येईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक सहन केली जाणार नाही.
कृषीमंत्री
