| मुंबई | प्रतिनिधी |
कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना अनधिकृतरित्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या गोवंडीतील एका महिला डॉक्टरला बुधवारी (दि.13) रोजी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. गुलफशा शेख (30) असे या बोगस महिला डॉक्टरचे नाव असून ती गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात वास्तव्यास होती. गोवंडीच्या पी. वाय. थोरात मार्गावर एक महिला डॉक्टर अनधिकृतरित्या रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी पोलिसांनी पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसोबत तिच्या दवाखान्यावर छापा घातला. यावेळी ही महिला डॉक्टर रुग्णांवर उपचार करताना आढळली. यावेळी पोलिसांनी तिच्याकडे वैद्यकीय पदवीबाबत विचारणा केली. मात्र तिच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी नव्हती. त्यानुसार पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. पोलिसांनी तिच्या दवाखान्यातून काही औषधांचा साठा जप्त केला आहे.