| गडचिरोली | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील भामरागड येथे शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या दरम्यान भामरागड येथे पर्लकोटा नदीच्या पुलाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे पोलीस आपल्या गस्तीवर होते. काही पोलीस पर्लकोटा नदीच्या पलीकडील भागात होते. पर्लकोटा नदी पुलाचे काम सुरु असल्याने पुलावर काम करणारे कर्मचारीही कामावर होते. पोलिसांनी एका ठिकाणी संशयास्पद चुन्याचे मार्किंग पाहिले. पुलावरील कर्मचार्यांना बोलावून ते मार्किंग आपण केले का? असे विचारले असता आम्ही या ठिकाणी मार्किंग केले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक वाढला. पोलिसांनी या ठिकाणी तपासणीला सुरूवात केली. तितक्यात अगदी पुलाजवळ त्याच ठिकाणी स्फोट झाला, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या ठिकाणी पुन्हा एखादी घटना घडण्याची शक्यता विभागाकडून वर्तविली जातं आहे. त्यामुळे बॉम्बशोधक पथकाद्वारे या ठिकाणी तपासणी सुरु आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भामरागड व अल्लापल्ली मार्गांवरील सर्व वाहने थांबवण्यात आली आहेत.दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी 15 नोव्हेंबरला चंद्रपूरच्या सभेत गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात आला. 31 मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडमधील नक्षलवाद संपवू, अशी घोषणा केली. त्यातच उद्या 17 नोव्हेंबरला ते गडचिरोलीत येणार आहेत. या घोषणेनंतर काही तासांतच भामरागडमधून स्फोटाची बातमी आल्याने खळबळ उडाली आहे.