गोरगरीब ग्राहकांना फुकटचा भुर्दंड
| श्रीवर्धन | वार्ताहर |
महावितरणच्या संदर्भात वाढती अव्वाच्या सव्वा बिले येणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे आदी नेहमीच्या तक्रारी असतातच. आता तर कर्मचार्यांना सतत वीज बिले वसुलीच्या कामाला लावल्याचे वृत्त आहे. परंतु, बिले वसूल झाली नाही तर वीजपुरवठा चालूच ठेवणे हे कोणत्याही यंत्रणेला शक्यच नाही, हेही तितकेच खरे आहे. पण, सध्या महावितरण, श्रीवर्धनच्या कार्याबद्दल एक नवीनच तक्रार समोर आली आहे. ती म्हणजे, श्रीवर्धन कार्यालयाकडे गेल्या सात-आठ महिन्यांपासून नवीन मीटर्सच उपलब्ध नाहीत.
अशा परिस्थितीत ज्यांचे मीटर्स फॉल्टी आहेत किंवा ज्यांना नवीन घ्यायचे आहेत त्यांना खासगीरित्या दुकानांमधून मीटर्स विकत घेण्याशिवाय पर्यायच उरत नाही आणि त्यांची किंमत प्रत्येकी दोन हजारच्या दरम्यान असते. महावितरणकडे मीटर्स नसल्यामुळे हा फुकटचा भुर्दंड ग्राहकांना का, अशी संतप्त प्रतिक्रिया वीज ग्राहकांकडून वारंवार व्यक्त होत आहे. यातील दुसरा मुद्दा म्हणजे, महावितरणकडून ग्राहकांकडून मीटर भाडे घेतले जात असेल आणि जर नवीन मीटर ग्राहकांनी स्वखर्चाने विकत आणला तर मग महावितरणने मीटर भाडे ग्राहकांकडून घेणे हे सर्वस्वी चुकीचे आहे. तरी वरील दोन्ही बाबतीत महावितरणने समाधानकारक खुलासा करावा, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.