‘बोंडशेत’ ठरले ‘स्वदेस’च्या स्वप्नातील गाव

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यामध्ये 75 स्वप्नातील गावे घडवण्यात आलेली आहेत. माणगाव तालुक्यामध्ये भाले ग्रामपंचायतीमधील बोंडशेत गाव स्वदेश फाऊंडेशनने स्वप्नातील गाव म्हणून घोषित केले आहे. या गावास मिसेस इंडिया वर्ल्ड 2022-23 सरगम कौशल यांनी भेट दिली. कार्यक्रमाची सुरुवात गावाच्या स्वागत कमानीचे उद्घाटन फीत कापून मिसेस इंडिया सरगम कौशल, आ. अनिकेत तटकरे, स्वदेस फाउंडेशन संचालक प्रदीप साठे, उपसंचालक तुषार इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात गावामध्ये प्रवेश करण्यात आला.

स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांच्या सहीचे स्वप्नातील गाव गुणगौरव प्रमाणपत्र सरगम कौशल, आ. अनिकेत तटकरे, प्रदीप साठे यांच्या हस्ते गाव विकास समितीला देण्यात आले तसेच बोंडशेत, मानकरवाडी, बौद्धवाडी स्वप्नातील गाव नाम फलकाचे अनावरण गावाच्या वेशीवर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर पवार यांनी केले. तर प्रास्ताविक गाव विकास समिती अध्यक्ष संजोग मानकर, ग्रामस्थ, गाव विकास समिती, महिला मंडळ, मुंबई मंडळ, आजूबाजूच्या गावामधील गाव विकास समिती सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version