| म्हसळा | प्रतिनिधी |
केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालयात ‘जागतिक पुस्तक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन तसेच ग्रंथपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला माजी सभापती महादेव पाटील, सहा.कृषी अधिकारी रामेश्वर मगर, वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, खजिनदार सुनील उमरोटकर, संचालक प्रा.रायप्पा माशाळे, सहाय्यक अधीक्षक सुशीलकुमार गाडगे, कृषी सेवक धनंजय साठे, राहुल झडे, मंदार नवघरे, रमेश पवार, डाटा ऑपरेटर परशुराम नाक्ती, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, अनुष्का म्हात्रे उपस्थित होते.
ग्रंथ प्रदर्शनात विश्वकोश, महर्षी व्यास, माझी मायबोली, साने गुरुजी, युगंधर, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, वचनामृत, स्वामी, मृत्युंजय, पानिपत, कृष्णमय मीरा, चंद्रगुप्त मौर्य, अध्यात्मिक, ऐतिहासिक, धार्मिक, अशी विविध विषयांवरचे ग्रंथ होते. कार्यक्रमात बोलताना संचालक मंडळाचे सदस्य प्रा.रायप्पा माशाळे यांनी पुस्तक निर्मितीचा इतिहास अत्यंत रंजक असल्याचे सांगितले. पंधराव्या शतकापूर्वी भूर्जपत्र व ताडपत्रांवर नैसर्गिक झाडपालांपासून तयार केलेल्या शाईने ग्रंथ लिहिले जात असत असे त्यांनी नमूद केले. पुढे पंधराव्या शतकात ‘जोहान्स गुटेनबर्ग’ यांनी छापखान्याचा शोध लावल्याने मुद्रणकलेला नवे युग प्राप्त झाले. भारतात छापखान्याचा प्रसार एकोणीसाव्या शतकात झाला. सन 1810 मध्ये विल्यम केरी यांनी ‘द डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज’ हे मराठीत छापील पुस्तक प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर छपाई तंत्रज्ञान झपाट्याने विकसित झाले. आजच्या घडीला भारतात दररोज हजारो पुस्तके प्रकाशित होत असून भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता छपाई व प्रकाशन क्षेत्रासाठी वरदान ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक पुस्तक दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन
